"ममता किंवा उद्धव ठाकरेंना नेता करा"; सत्यपाल मलिक यांचाही उडाला राहुल गांधींवरील विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:24 IST2024-12-08T16:14:20+5:302024-12-08T16:24:26+5:30
सत्यपाल मलिक यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरुन ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

"ममता किंवा उद्धव ठाकरेंना नेता करा"; सत्यपाल मलिक यांचाही उडाला राहुल गांधींवरील विश्वास
Satyapal Malik on INDIA Alliance : हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली आहे. महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर आणि नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसनंतर माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा ही राहुल गांधींवरील विश्वास उडाल्याचं दिसत आहे. सत्यपाल मलिक यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरुन ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नुकताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडियाआघाडीच्या नेतृत्वावर आपला दावा ठोकला आहे. समाजवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ममतांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. अशातच आता माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या नेत्या म्हणून पुढे आणले तर ही आघाडी निश्चितच यशस्वी होईल, असे मलिक यांचे म्हणणं आहे. त्यांनी ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी सर्वोत्तम नेते मानले आहे.
सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्याने ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची ओळख मजबूत आणि प्रभावशाली नेते म्हणून झाली आहे. जेव्हा इंडिया आघाडीतील विविध पक्ष त्यांचे नेतृत्व आणि निवडणुकीबाबत विचार करत असतानाच सत्यपाल मलिक यांनी हे विधान केलं आहे. सत्यपाल मलिक यांनी ममता आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही इंडिया आघाडीसाठी योग्य नेता म्हणून वर्णन केले आहे.
"इंडिया आघाडीसाठी आज जर कोणी सर्वात मजबूत नेत्या असतील तर त्या म्हणजे ममता बॅनर्जी. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या नेत्या म्हणून पुढे येऊ दिले तर इंडिया आघाडी नक्कीच यशस्वी होईल. इंडिया आघाडीसाठी सर्वोत्कृष्ट नेते ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे आहेत,” असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.
आज़ के समय में इंडिया गठबंधन के लिए सबसे मजबूत नेता कोई है तो ममता बनर्जी है।
— Satyapal Malik (@SatyapalMalik6) December 8, 2024
अगर इंडिया गठबंधन के सभी दल ममता बनर्जी को अपने नेता के रूप में आगे आने दें तो यकिनन इंडिया गठबंधन सफ़ल होगा।
इंडिया गठबंधन के लिए सबसे अच्छे नेता ममता बनर्जी ओर उद्धव ठाकरे जी है- सत्यपाल मलिक (पूर्व…
दुसरीकडे, शरद पवार यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्सचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, "तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा या सक्षम नेत्या असून त्यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
मी इंडिया आघाडीची स्थापन केली - ममता बॅनर्जी
"मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती चालवण्याची जबाबदारी आहे. ते जर हे व्यवस्थित करत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी फक्त इतकंच म्हणेन की, सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.