VIDEO- माझं सरकार आल्यावर 'हा' प्रश्न मला विचारा- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:10 AM2018-04-18T09:10:01+5:302018-04-18T09:10:01+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत.
अमेठी- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधींनी मंगळवारी जनपतमधील एका मुलींच्या शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
'अमेठीचा विकास करणं हे काम योगी आदित्यनाथ यांचं आहे. अमेठी हा जरी माझा मतदार संघ असला तरी त्यामध्ये कायदे तयार करणं हे माझं काम आहे. पण त्याचा विकास करणं हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं काम आहे', असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एका व्हिडीओमध्ये राहुल गांधींना एक विद्यार्थिनी प्रश्न विचारताना पाहायला मिळते आहे. 'सरकार अनेक विधेयकं संमत करते आहे पण गावागावात त्याची अंमलबजावणी का होताना दिसत नाही? असा प्रश्न विद्यार्थिनीने राहुल गांधी यांना विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी म्हटलं की, ' हा प्रश्न तुम्ही मोदीजींना विचारा. आता माझं सरकार नाहीये.जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा हा प्रश्न आम्हाला विचारा'. राहुल गांधींच्या या उत्तराला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
दुसऱ्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी म्हटलं की,'अमेठी तर योगी आदित्यनाथ चालवतात. मी फक्त अमेठीचा खासदार आहे. माझं काम लोकसभेत कायदा तयार करण्याचं आहे. पण योगी आदित्यनाथ यांचं काम उत्तर प्रदेश चालविण्याचं आहे. पण योगीजी सध्या दुसरं काम करत आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.