VIDEO: ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात जेवणासाठी मारामारी; प्लेट्स तुटल्या, आयोजकांची नाचक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:58 IST2025-02-26T17:57:58+5:302025-02-26T17:58:22+5:30
मध्य प्रदेशात झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये जेवणादरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं.

VIDEO: ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात जेवणासाठी मारामारी; प्लेट्स तुटल्या, आयोजकांची नाचक्की
MP Global Investment Meet:मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित केलेल्या इन्व्हेस्टर समिटमध्ये देश-विदेशातील मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या समिटमध्ये उद्योगपतींनी मध्य प्रदेशात मोठी गुंतवणूक केली. पण जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान जागतिक गुंतवणूकदारांच्या समिटमध्ये घडलेल्या प्रकारामुळे या कार्यक्रमाची नाचक्की झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी जेवणासाठी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोक खाण्यासाठी ताट एकमेकांकडून हिसकावताना दिसत आहेत.
२४-२५ फेब्रुवारी रोजी भोपाळमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक मोठे उद्योगपती आले आणि त्यांनी लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवली. परदेशी पाहुण्यांसोबतच देशातील मोठे उद्योगपतीही या समिटमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत बडे राजकारणीही समिटमध्ये आले होते. मात्र आता वेगळ्याच कारणामुळे हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. या समिटचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये लोक खाण्यासाठी प्लेट्स एकमेकांच्या हातातून हिसकावताना दिसत आहेत. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवण सुरु होताच लोकांनी खाण्यासाठी प्लेट घेण्यासाठी गोंधळ सुरू केला. यावेळी झालेल्या खेचाखेचीत अनेक प्लेट तुटल्या. लोक प्लेट घेण्यासाठी धडपड करू लागले. काही जण तर भांडतानाही दिसले. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा व्हिडिओ शेअर करून मध्य प्रदश काँग्रेसने कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भूख की लूट,
— MP Congress (@INCMP) February 25, 2025
प्लेट झपटने की छूट!#Bhopal | #InvestInMPpic.twitter.com/l4kS6IAjKq
"सरकार ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा दावा करत आहे. आणि लोक ताटं लुटत असल्याचं चित्र दिसलं. हा किती विरोधाभास आहे. लोक ताटांची लूट करत आहेत. एकीकडे अनेक बडे उद्योगपती आले आणि गुंतवणुकीच्या गप्पा मारत होते. तर दुसरीकडे लोक प्लेट घेण्यासाठी धडपडत होते. याचा राज्य सरकारच्या प्रतिमेवर खूप वाईट परिणाम होत आहे," अशी टीका काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटवर सुमारे ८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या गुंतवणुकीच्या महाकुंभाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून सुमारे २५,००० पाहुणे भोपाळमध्ये आले होते.