इंडिया आघाडीत जागावाटपाचा पेच; राहुल गांधी करणार अखिलेश यादव यांच्याशी चर्चा, मार्ग निघेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:46 AM2024-01-18T09:46:04+5:302024-01-18T09:48:42+5:30
India Alliance News: राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार का, या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
India Alliance News: एकीकडे लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडी पुढील रणनीतिवर भर देत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, त्या त्या भागात इंडिया आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जागावाटपावरून इंडिया आघाडीत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून खटके उडत असल्याची चर्चा आहे. याबाबत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या चर्चा होऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी याबाबत माहिती दिली. इंडिया आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि सपा यांच्यात दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसशी सपासोबत आणखी एक बैठक होणार आहे. मात्र, त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर, काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे हे सपा नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करतील, असे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार का?
आघाडी होणारच याचा पुनरुच्चार अखिलेश यादव यांनी केला. एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, काँग्रेस आम्हाला त्यांच्या कार्यक्रमांना आमंत्रित करत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचा अर्थ काढला जात आहे, असे विधान अखिलेश यादव यांनी केले.
दरम्यान, २२ जानेवारी हा चांगला दिवस आहे. रामराज म्हणजे काय याचा विचार लोकांनी केला पाहिजे. जिथे संविधान पाळले जाते तिथे रामराज असते, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.