देशाची सुरक्षा, युवकांचे भवितव्य धोक्यात : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:45 PM2022-07-25T14:45:48+5:302022-07-25T14:46:19+5:30
पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगाने देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयोगशाळेतील अग्निपथच्या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केंद्रावर केली. दरवर्षी ६० हजार सैनिक निवृत्त होतात. त्यापैकी केवळ ३ हजार जणांना सरकारी नोकरी मिळते. अशा स्थितीत चार वर्षांच्या करारानंतर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निविरांचे भवितव्य काय असेल, असा परखड सवाल ट्वीटद्वारे केला आहे. पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगाने देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत.
असेही ते म्हणाले.
साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांची कंत्राटी तत्त्वावर केवळ चार वर्षांसाठी लष्करी सेवेत भरती आणि नंतर त्यातील केवळ २५ टक्के तरुणांना पुढील १५ वर्षांसाठी सेवेत सातत्य देण्याची अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर देशभर हिंसक निदर्शने झाली होती. संतप्त तरुणांनी ठिकठिकाणी रेल्वे पेटवल्या होत्या. नंतर २०२२साठी या योजनेची कमाल वयोमर्यादा २३पर्यंत वाढवण्यात आली. (वृत्तसंस्था)