"नरेंद्र मोदींचा सामना करायचा असल्यास राहुल गांधींना पक्षाचे अध्यक्ष करण्याशिवाय पर्याय नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:41 AM2021-05-05T09:41:51+5:302021-05-05T09:45:02+5:30
काँग्रेसला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आता राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आहे.
नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यातही आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये काँग्रेसचा सफाया झाला आहे. आधीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी सुरू असतानाच आता पक्षाचा या पाचही राज्यात झालेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील पाचही राज्यातील निवडणूक रणनीती काँग्रेस नेते आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी ठरवली होती. राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे खासदार आहेत. त्यामुळे केरळमध्ये पक्षाची चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राहुल गांधी यांनीही केरळवर सर्वाधिक लक्षकेंद्रित केलं होतं. तर प्रियांका गांधी यांनी आसामवर सर्व लक्ष केंद्रीत केलं होतं. पाच राज्यातील निवडणुका असताना या दोन्ही नेत्यांनी केवळ या दोनच राज्यांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. तरीही काँग्रेसचे हे दोन्ही नेते या दोन्ही राज्यांमध्ये यशस्वी झाले नाहीत. तसेच सत्ता विरोधी वातावरण असतानाही मतदारांना आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसचं नेतृत्व यशस्वी झालं नसल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी पक्षाबाबत एक महत्वाच विधान केलं आहे.
काँग्रेसला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आता राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आहे. आता पक्षात मोठे फेरबदल करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करायचा असेल तर राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणत संजय निरुपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी स्वत:ला केवळ केरळ पुरतेच मर्यादीत ठेवले. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफसाठी राहुल गांधी सकारात्मक वातावरण निर्माण करतील असं वाटत होतं. राहुल यांनी प्रचाराचं तंत्र बदलून लोकांमध्ये मिसळून त्यांनी संवाद साधायलाही सुरुवात केली होती. तरीही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं वर्चस्व मोडीत काढण्यात राहुल गांधींना यश आलं नाही. केरळच्या चार दशकातील इतिहासात पहिल्यांदाच सत्तेतील पक्षाला मतदारांनी दुसऱ्यांदा सत्तेचा कौल दिला आहे. सरकारविरोधी वातावरण असतानाही आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसला त्याचा फायदा उचलता आला नसल्याचं या निवडणुकीतून अधोरेखित झालं आहे.
जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो- राहुल गांधी
जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो. निवडणूक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे लाखों आभार मानतो. तसेच काँग्रेसवर ज्यांनी विश्वास दाखवला, त्या सर्वांचेही आभार मानतो. मूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील. जय हिंद, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.
काँग्रेसमधील वाद उफाळणार?
पाच राज्यातील पराभवामुळे गांधी कुटुंबाच्या विरोधात पक्षातील नाराज नेते पुन्हा एकदा दंड थोपाटण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये काँग्रेसचं खातंही उघडलेलं नाही. आसाम-केरळमध्ये मोठा पराभव झाला आणि पाँडेचेरीत सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. त्यामुळे काँग्रेसमधील असंतुष्ट नेते (जी-23) काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे.