पक्षाला प्रभावी, पूर्ण वेळ नेतृत्वाची गरज; २३ बड्या नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 12:25 PM2020-08-23T12:25:53+5:302020-08-23T12:27:58+5:30
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचं सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली आहे. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-
१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.
२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.
३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.
४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?
१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात
३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची
४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.
६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित.