काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षापेक्षा मुलांची काळजी केली, राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 08:54 AM2019-05-26T08:54:28+5:302019-05-26T08:55:02+5:30
सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभावाच सामना करावा लागल्याने काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण आहे.
नवी दिल्ली - सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभावाच सामना करावा लागल्याने काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव पक्षाने फेटालळा होता. मात्र राजीनाम्यावर ठाम राहण्याचे संकेत देतानाच राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांच्या पुत्रप्रेमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी पक्षहितापेक्षा पुत्रप्रेमाला प्राधान दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीतील पराभावाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती. यावेळी पराभवामुळे संतप्त झालेल्या राहुल गांधी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मुलांना तिकीट मिळवून देण्यासाठी आणलेल्या दबावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी दबाव आणल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पुत्रप्रेमाला प्राधान्य दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
''ज्या राज्यांमध्ये कांग्रेसची सत्ता आहे अशा राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपापल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला, मात्र मी त्याबाबत फारसा अनुकूल नव्हतो,'' असे राहुल गांधी यांनी सांगितले.
''काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही. प्रचारादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून भाजपा आणि मोदींविरोधात एक भक्कम जनमत तयार केले गेले नाही,'' अशी नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याशिवाय असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी राहुल यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला असला तरी राहुल आपल्या निर्धारावर ठाम आहेत.
कॉँग्रेसने निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढविल्या. त्यामुळे यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे असल्याचे राहुल यांनी सांगितले. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या, असे राहुल यांनी बैठकीत सांगितले. या वेळी कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी याचा निर्णय राहुल यांनीच घ्यावा, असे सांगितले.