राफेल करार कोणासाठी? हवाई दलासाठी की गाळ्यात गेलेल्या कंपनीसाठी?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 08:39 AM2019-02-09T08:39:37+5:302019-02-09T08:41:06+5:30

राफेल करारवरुन शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

shiv sena takes a dig at pm narendra modi over rafale deal | राफेल करार कोणासाठी? हवाई दलासाठी की गाळ्यात गेलेल्या कंपनीसाठी?; शिवसेनेचा सवाल

राफेल करार कोणासाठी? हवाई दलासाठी की गाळ्यात गेलेल्या कंपनीसाठी?; शिवसेनेचा सवाल

Next

मुंबई: काँग्रेसला लष्कराचे बळकटीकरण नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीराफेल डीलवरुन सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत असताना शिवसेनेनंदेखील मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला.

राफेल डीलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधींनी सातत्यानं केला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. त्यावेळीही संसदेत शिवसेनेनं भाजपाला अडचणीत आणलं होतं. राफेल विमान खरेदी प्रकरणात पारदर्शकता असेल, तर मग संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्यास काय हरकत आहे, असं म्हणत शिवसेनेनं मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. काल 'द हिंदू' वृत्तपत्रानं राफेल डीलमध्ये मोदींनी समांतर वाटाघाटी केल्या. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या बोलणीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. मोदींच्या या हस्तक्षेपाचा संरक्षण मंत्रालयानं निषेध केल्याची कागदपत्रंदेखील प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले. त्यानंतर आज शिवसेनेनं सामनामधून मोदी सरकारवर शरसंधान साधलं. 

'जाहीर सभेत तावातावाने बोलावे व झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण आपले पंतप्रधान मोदी संसदेतही करतात. सत्ताधारी पक्षाचे लोक पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर बाके बडवीत असतात. पण त्यामुळे संसदेच्या थोर परंपरेत काही भर पडत आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेसला ठोकून काढले. चांगलीच सालटी काढली. देशाचे हवाई दल बळकट होऊ नये यासाठीच राफेल करारावर सातत्याने टीका सुरू असल्याचा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेसला लष्कराचे बळकटीकरण नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे? राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे,' असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

'राफेलच्या व्यवहारात थेट आपले मोदीच ‘डील’ करीत होते. संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव वगैरे प्रमुख मंडळीना या व्यवहारापासून लांब ठेवले गेले. राफेलच्या किमती ठरवण्यापासून ते हे कंत्राट कुणाला द्यायचे याबाबतचे सर्व निर्णय मोदी यांनीच घेतले आहेत. त्यामुळे आरोप व टीकेचे धनी त्यांना व्हावेच लागेल. ‘चौकीदार चोर है’ हा नारा राहुल गांधी यांनी दिला व तो देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. यास काँग्रेस जबाबदार नाही तर राफेल प्रकरणातली आता उघड झालेली लपवाछपवी कारणीभूत आहे. श्री. मोदी म्हणतात, “तुम्ही मोदींवर टीका करा, भाजपवर टीका करा, पण देशावर टीका करू नका.’’ याचा अर्थ मोदीभक्तांनीच समजावून सांगावा. संशयास्पद व्यवहार जो राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे त्यावर खुलासा मागणे ही देशावर टीका कशी काय होऊ शकते? देशात लोकशाही आहे व तिचे खच्चीकरण कोण करीत आहे? लोकशाही व न्याय व्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे व हा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदी सरकारचा समाचार घेतला.

'साडेचार वर्षांपासून देशावर मोदींचे एकछत्री राज्य आहे. तरीही महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे हे स्वतःचे अपयश झाकण्यासारखे आहे. सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले? या प्रश्नाच्या फेर्‍यातून मोदी व त्यांचे सरकार सत्तेचा कालावधी संपत आला तरी बाहेर पडलेले नाही. लोकांनी त्यांना सत्ता दिली, पण सत्ता ही फक्त विरोधकांच्या नाड्या आवळण्यासाठीच वापरली गेल्याने सत्ताधार्‍यांना पुनःपुन्हा काँग्रेसवर टीका करावी लागत आहे. काँग्रेसने देश कमजोर केला हा मोदींचा आरोप मान्य आहे. काँग्रेसवाले चोर, लफंगे, भामटे व डाकू आहेत. प्रत्येक काँग्रेसवाल्यास भरचौकांत फासावर उलटे लटकवायला हवे. काँग्रेस ही शिवी आहे हे सर्व मान्य केले तरी राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराबाबत विचारलेले प्रश्न कायम आहेत. पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटीस विकत घेण्यामागचा तर्क काय? व समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारीत राहील. राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 
 

Web Title: shiv sena takes a dig at pm narendra modi over rafale deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.