'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:42 PM2018-12-20T17:42:00+5:302018-12-20T17:50:46+5:30
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजकीय वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर जिंदा है.'' राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असले तरी काँग्रेस आणि भाजपाच्या संख्याबळामध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.
बुधवारी रात्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी अंतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर जिंदा है,'' चौहान बोलत असतानाच पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार का? अशी विचारणा मागून झाली. तेव्हा ''कदाचित पाच वर्षेही लागणार नाहीत,''असे प्रत्युत्तर शिवराज सिंह चौहान यांनी दिले.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सकाळीसुद्धा एक ट्विट केले. त्यात उंच उडी घेण्यासाठी दोन पावले मागे हटावे लागते, असे या ट्विटमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
सध्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. मात्र सपा, बसपा आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 121 वर पोहोचले आहे. तर भाजपाकडे 109 आमदार आहेत.