'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:05 PM2024-10-01T22:05:43+5:302024-10-01T22:06:18+5:30
Shivraj Singh Chuahan on Rahul Gandhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
Shivraj Singh Chuahan on Rahul Gandhi : हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे. दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते सक्रीयपणे राज्यात प्रचार करत आहेत. दरम्यान, आज भाजप ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बहादुरगड विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
राहुल गांधींना लाज वाटत नाही
हरियाणातील बहादूरगड येथे एका जाहीर सभेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राहुल गांधी मोदीविरोधी भूमिकेने इतके वेडे झाले आहेत की, ते खोटे बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत. पृथ्वीवरचे सर्व खोटे बोलणारे मेले असतील, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला असावा. राहुल गांधींना खोटं बोलायला लाजही वाटत नाही, अशी बोचरी टीका शिवराज यांनी केली.
#WATCH | Haryana: During a public rally in Bahadurgarh, Union Minister Shivraj Singh Chouhan says, "...Rahul Gandhi has gone mad over 'Modi-virodh' that he keeps lying...his birth must have happened when all the liers on the earth died...he is not even ashamed...Kharge said that… pic.twitter.com/zDrAwYv1Qq
— ANI (@ANI) October 1, 2024
खर्गेंवर साधला निशाणा
शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही निशाणा साधला. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना हटवल्याशिवाय मी मरणार नाही. दादा तुम्ही हजारो वर्षे जगा. पण, राजकारणात एवढा राग यायलाच हवा का? असा सवाल शिवराज सिंह यांनी केला.
काय म्हणाले राहुल गांधी ?
राहुल गांधी यांनीदेखील आज हरियाणाच्या बहादुरगडमध्ये पक्षाचा प्रचार केला. यावेळी त्यांनी मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, "तुम्ही अंबानींचे लग्न पाहिले आहे का? अंबानींनी लग्नात करोडो रुपये खर्च केले. हा पैसा कोणाचा आहे? हा तुमचा पैसा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज घेता, पण नरेंद्र मोदींनी एक अशी सिस्टीम बनवली आहे, ज्यात निवडक 25 लोक लग्नावर करोडो रुपये खर्च करू शकतात. हा संविधानावर हल्ला नाही, तर काय आहे? पीएम मोदी, अदानी आणि अंबानींना जेवढे पैसे दिले, तेवढेच पैसे आम्ही गरिबांना देऊ," असे राहुल यावेळी म्हणाले.
भाजप संविधानावर हल्ला करत आहे
"भाजप सातत्याने संविधानावर हल्ला करत आहे. आरएसएसचे लोक आपल्या लोकांना देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये बसवतात, दलित आणि मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेतात, तेव्हा हा संविधानावर हल्ला आहे. पंतप्रधान मोदी अदानी आणि अंबानींना मदत करतात आणि देशाची रोजगार व्यवस्था उद्ध्वस्त करतात, तेव्हा हा संविधानावर हल्ला आहेत. भाजप संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करतोय. पंतप्रधान मोदी अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात आणि शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे कर्ज माफ करत नाहीत, तेव्हा ते संविधानावर हल्ला करत आहेत. अदानीला मदत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी तीन कृषी कायदे आणतात, तेव्हा हा संविधानावर हल्ला आहे," अशी बोचरी टीकाही राहुल यांनी यावेळी केली.