"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 03:06 PM2023-12-23T15:06:01+5:302023-12-23T15:20:18+5:30
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केला हल्लाबोल
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करून अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. एएनआयशी बोलताना स्मृती इराणी यांनी आरोप केला की, गांधी कुटुंबाने 'औद्योगीकरणाच्या' नावाखाली अमेठीतील शेतकरी आणि इतर लोकांच्या जमिनी हडप केल्या. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वापरण्यात येणारी जमीन गांधी परिवाराने कार्यालयासाठी बळकावली.
गांधी परिवाराकडून अमेठीतील जनतेची फसवणूक
स्मृती इराणी म्हणाल्या की, लोक माझ्यावर विश्वास ठेवू शकतात हे पटवून देण्यासाठी मला थोडा वेळ लागला. गांधी घराण्याने लोकांकडून त्यांच्या जमिनी लुटल्या होत्या, हे मी संसदेत बोलले. ३० एकर जमीन ६०० रुपये भाड्याने घेतली. गांधी परिवार तिथे स्वतःसाठी छान आणि सुंदर कॉम्प्लेक्स बांधतोय. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा हे अमेठीतील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे आदेश देऊ शकतात हा परकीय विचार आहे. परंतु त्यांनी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली या जमिनी घेतल्या आहेत. गांधी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंदोलन करणाऱ्या मुलींना तुरुंगात टाकण्यात आल्याचा दावाही इराणी यांनी केला.
पॉडकास्ट दरम्यान, स्मृती इराणी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय आयुष्याबद्दल देखील सांगितले आणि त्यांना शिष्यवृत्ती कशी मिळाली ते सांगितले. मुंबईत जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडील वेगवेगळ्या विचारसरणीचे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात अनेक मतभेद झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये राहुल गांधींकडून पराभूत झाल्या, त्यानंतर 2019 मध्ये इराणी यांना विजय मिळवत त्या पराभवाचा बदला घेतला. सध्याच्या घडीला ४७ वर्षीय इराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण सदस्य आहेत.