"राहुल गांधींना पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती होती"; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 08:21 AM2023-05-16T08:21:10+5:302023-05-16T08:22:33+5:30
Smriti Irani And Rahul Gandhi : इराणी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधींचा सुमारे 55,000 मतांच्या फरकाने पराभव केला.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सांगितले की, अमेठीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात त्या महिला आहेत म्हणून नाही तर पक्षाला वाटत होते की केवळ त्याच राहुल यांचा पराभव करू शकतात. तसेच महिला रिअल एस्टेट डेव्हलपर्सना त्वरीत मंजुरी देण्याचा विचार करावा असंही म्हटलं आहे.
"मी पुरुष विकासकांशी स्पर्धा करेन... मी एक महिला आहे म्हणून मला अमेठीला पाठवण्यात आले नाही" असं महिला आणि बालविकास मंत्री इराणी यांनी क्रेडाई या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत सांगितले. मला अमेठीला पाठवण्यात आले कारण त्या माणसाला (राहुल गांधी) पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती होती." इराणी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधींचा सुमारे 55,000 मतांच्या फरकाने पराभव केला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून त्यांचा एक लाख मतांच्या फरकाने पराभव झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आणि तेथील कार्यकर्ते, नेत्यांचे आभारही मानले.
“कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. जनतेच्या शक्तीनं ताकदीचा पराभव केला. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांसोबत उभी राहिली. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर लढलो. आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
“आम्ही प्रेमानं ही लढाई लढलो. हा देशाला प्रेमच आवडतं हे कर्नाटकानं दाखवून दिलं. कर्नाटकात आता द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं खुली झाली आहेत. हा सर्वांचा विजय आहे. सर्वप्रथम हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासनं दिली होती. आम्ही ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू” असंही त्यांनी स्पष्ट केल.