"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:05 PM2024-05-08T18:05:02+5:302024-05-08T18:08:08+5:30
Smriti Irani rection on Sam Pitroda: सॅम पित्रोदा यांनी देशातील नागरिकांच्या रंग आणि दिसण्यावरुन वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे.
Smriti Irani rection on Sam Pitroda: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतात. नुकताच देशातील नागरिकांच्या रंग आणि दिसण्यावरुन वक्तव्य करत त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी भारताच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांची चायनीज, आफ्रिकन आणि अरब लोकांशी तुलना केली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाने तर पित्रोदा यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. अशातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पित्रोदा यांच्यावर बोचरी टीका केली.
"काँग्रेस पार्टी धर्म आणि जातीच्या नावावर इतके वर्षे राजकारण करत होती. आता त्यांच्यातील आणखी वाईट मानसिकता समोर आली आहे. या देशात कोण कुठल्या वर्णाचा आहे, कोण कुठल्या विभागाचा आहे या आधारावर भारतीयांमध्ये भेद करत आहे. आज काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी जे विधान केलं, ते अतिशय निंदनीय आहे. यातून राहुल गांधी आणि गांधी परिवार देशाप्रति काय विचारसरणी बाळगतात त्याचे हे उदाहरण आहे," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदा यांच्या विधानाचा समाचार घेतला.
#WATCH | On Sam Pitroda's statement, Union Minister & BJP leader Smriti Irani says, "Today, we have found out another disgusting truth about the Congress party, which has been dividing the country in the name of religion and caste, that it also insults people based on their… pic.twitter.com/uFXi3JMznP
— ANI (@ANI) May 8, 2024
सॅम पित्रोदा नक्की काय म्हणाले?
ईशान्य भारतातील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत. आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे, तशीच ती आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या ७५ वर्षात प्रत्येकाला जगता येईल असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. पण काही फरक पडत नाही. आपण सर्व बंधुभावाने राहतो," असे विधान सॅम पित्रोदा यांनी केल्याने वाद निर्माण झाला.