Smriti Irani Wayanad Visited: स्मृती इराणींचे सूचक वक्तव्य, वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:33 AM2022-05-04T10:33:08+5:302022-05-04T10:33:24+5:30
Smriti Irani Wayanad Visited: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वायनाडच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यादरम्यान मीडियाशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Smriti Irani Wayanad Visited: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani ) यांनी मंगळवारी केरळमधील काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडला (Wayanad) भेट दिली. यावेळी इराणी यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून जिल्ह्यात अद्याप फारसा विकास झाला नसल्याचा आरोप केला. स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठकीनंतर इराणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वायनाडमध्ये निवडणूक लढवण्याबाबत महत्वाची माहिती दिली.
वायनाडमधून निवडणूक लढवणार?
पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचाही समाचार घेतला. मीडियाने विचारले की, पक्षाने तुम्हाला वायनाडचे तिकीट दिल्यावर तुम्ही येथून निवडणूक लढवणार का? त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या, "मी राहुल गांधी नाही, मी अमेठीतून पळत नाही. मी अमेठीपासून वायनाडपर्यंत पूरक गोष्टी घेऊन येते. पक्षाने मला वायनाडची जबाबदारी दिली, तर मी विचार करेल, अशी माहिती इराणी यांनी दिली.
जिल्हयात कुठलाही विकास झाला नाही
सध्या देशातील आदिवासींचे जीवन सुखकर करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा मजबूत आणि विकसित करणे आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पोषण आहार आणि आर्थिक सेवा यांसारख्या सेवा तिथल्या लोकांपर्यंत, विशेषतः गरीब लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुठलाही विकास झाला नाही, असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात की, जिल्ह्यात सुमारे 1.35 लाख घरांमध्ये पाण्याची जोडणी नसणे, आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष, त्यांच्या जमिनीच्या नोंदींचे डिझिटायझेशन न होणे आणि कौशल्य विकास सुनिश्चित करणे यासारख्या विविध त्रुटी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, स्मृती इराणींच्या या दौऱ्यानंतर त्या वायनाडमधून निवडणूक लढवू शकतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे.