'तर मला आणि माझ्या वडिलांना काँग्रेसमध्ये का घेतलं?', गद्दार म्हटल्यावरून ज्योतिरादित्य भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 01:09 PM2023-07-23T13:09:55+5:302023-07-23T13:10:07+5:30
"माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित..."
काँग्रेसकडून गद्दार म्हणत करण्यात आलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, असे होते, तर काँग्रेसने त्यांना आणि त्यांचे वडील माधवराज शिंदे यांचा पक्षात का सामील करून घेतले होते? ज्यांनी इतिहासाचे एक पानही वाचलेले नाही, त्यांना जे बोलायचे आहे ते बोलावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, आपले विचार आणि विचारधारा मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित असल्याचेही शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले, "बघा ते त्यांचे काम करतील, ज्यांनी इतिहासाचे एक पानही वाचलेले नाही, त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या. माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे कर्म, विचार आणि विचारधारा ग्वाल्हेर, ग्वाल्हेर विभाग, मध्य प्रदेश आणि राष्ट्राला समर्पित आहे. जर त्यांना एवढीच चिंता होती, तर त्यांनी माझ्या वडिलांना (माधवराव शिंदे) आणि नंतर मला पक्षात का सामील करून घेतले.
प्रियंका गांधी यांच्या रॅलीपूर्वी लावण्यात आले होते पोस्टर -
नुकतेच, प्रियांका गांधी यांच्या भेटीदरम्यान स्मारकाच्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आले होते की, 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात शिंदेंनी रानी लक्ष्मीबाई आणि 1969 आणि 2020 मध्ये काँग्रेसला धोका दिला. मात्र, पोलिसांनी हे पोस्टर्स काढून टाकले होते.
विश्वासघाताच्या इतिहासाची पुनरावृत्ती -
प्रियांका गांधी 21 जुलैच्या रॅलीत बोलण्यापूर्वी विरोधी पक्षनेते गोविंद सिंह आपल्या भाषणात म्हणाले, "सर्वप्रथम या कुटुंबाने (शिंदे) लक्ष्मीबाईंना धोका दिला आणि नंतर 1967 मध्ये काँग्रेसला धोका दिला. (तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजींनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाडले होते.) आणि आता अपली संपत्ती वाचविण्यासाठी 2020 मध्ये काँग्रेसचे सरकारपाडून विश्वासघात करण्यात आला आहे."