काँग्रेसच्या संसदीय पक्षनेतेपदी सोनिया गांधी, कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 07:17 AM2024-06-09T07:17:38+5:302024-06-09T07:18:22+5:30
Sonia Gandhi News: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व खासदार सोनिया गांधी यांची शनिवारी पुन्हा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संविधान सदनाच्या (जुनी संसद) मध्यवर्ती सभागृहात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतचा प्रस्ताव ठेवला.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व खासदार सोनिया गांधी यांची शनिवारी पुन्हा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संविधान सदनाच्या (जुनी संसद) मध्यवर्ती सभागृहात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतचा प्रस्ताव ठेवला. त्यास गौरव गोगोई, तारिक अन्वर आणि के. सुधाकरन यांनी अनुमोदन दिले.
काँग्रेसच्या संसदीय पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोनिया यांनी पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या निवडणुकीत काँग्रेसने उत्तम कामगिरी बजावल्याची पावती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
विरोधी पक्षनेतेपद घ्या, राहुल यांना विनंती
राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
वायनाडची जागा राहुल सोडणार
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले. नियमानुसार एक मतदारसंघ सोडावा लागणार असल्याने ते वायनाडची जागा सोडणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. रायबरेली व अमेठी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ आहेत. सोनिया गांधींनी रायबरेलीचे अनेक वर्षे नेतृत्व केले. २०१९मध्ये राहुल यांचा अमेठीतून पराभव झाला होता, मात्र ते वायनाडमधून विजयी झाले होते.
यंदा सोनिया गांधी रायबरेलीत प्रचारासाठी गेल्या असता मी माझा मुलगा तुम्हाला सोपवित असल्याचे म्हणाल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीचेच नेतृत्व करणार असल्याचे समजते. वायनाडमध्ये पक्षाच्या स्थानिक नेत्यास उमेदवारी दिली जाऊ शकते.