सोनिया गांधी आता बदलणार पक्षाचा चेहरा; असंतुष्टांना आरसा दाखवल्यानंतर पुढचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:16 AM2021-10-18T06:16:57+5:302021-10-18T06:17:32+5:30

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असंतुष्टांना आरसा दाखविल्यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आता काँग्रेसचा चेहरा बदलण्याच्या कामाला लागल्या आहेत.

Sonia Gandhi will now change the face of the congress party | सोनिया गांधी आता बदलणार पक्षाचा चेहरा; असंतुष्टांना आरसा दाखवल्यानंतर पुढचे पाऊल

सोनिया गांधी आता बदलणार पक्षाचा चेहरा; असंतुष्टांना आरसा दाखवल्यानंतर पुढचे पाऊल

googlenewsNext

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली :  काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असंतुष्टांना आरसा दाखविल्यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आता काँग्रेसचा चेहरा बदलण्याच्या कामाला लागल्या आहेत. पुढल्या वर्षी होणाऱ्या काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीआधीच  राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने संकेत दिले की, त्यासाठी  त्यांनी राष्ट्रीयस्तरापासून ते जिल्हास्तरांवरील युवा चेहऱ्यांना पुढे आणण्याची रणनीतीही ठरविली आहे.

अलीकडेच विविध राज्यांतील संघटनात्मक फेरबदल करताना अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून हे नवीन चेहरे राहुल यांच्या पसंतीचे असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीआधी त्या प्रत्येक महत्त्वाच्या पदावर राहुल यांच्या निष्ठावतांची  नियुक्ती करतील. तसेच नवीन सरचिटणीसांच्या नियुक्त्याही त्यांच्या विषयपत्रिकेवर आहे. त्यांची ही मोहीम किती यशस्वी ठरते, हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमधील विधानसभा निवडणूक निकालातून निश्चित होईल. या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली तर, राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होणे निश्चित आहे. प्राप्त संकेतानुसार संघटनात्मक निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी गुलाम नबी आझाद यांनाही महत्त्वाचे पद देऊन हा गट (जी-२३)  खिळखिळा करतील.  १९९९ मध्ये सोनिया गांधी  यांच्याविरुद्ध  अध्यक्षपदासाठी जितेंद्र प्रसाद  मैदानात उतरले होते. त्याचप्रमाणे अंसतुष्ट गटाने राहुल गांधी यांच्याविरुद्ध एखाद्या नेता उभा केल्यास राहुल आपल्याविरोधातील उमेदवाराला पराभूत करण्यास यशस्वी होतील. कारण तोपर्यंत  सर्व महत्त्वपूर्णपदांवर निष्ठावंताची नियुक्ती  झालेली असेल. 

कार्यकारिणीच्या निवडणुकीतही राहुुल आणि सोनिया यांच्या पाठिंब्यावर ज्यांना मैदानात उतरविले जाईल, त्यांना विजयी करण्यासाठी अगोदरच त्यांना मतदान करणारे पक्षाचे प्रतिनिधी गांधी परिवाराच्या पसंतीचे असतील. 

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट सांगितले आहे की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदावर पाहण्यास उत्सुक आहे. 
दुसरीकडे ए. के. ॲन्टोनी, हरिश रावत, अशोक गेहलोत यांच्यासह अन्य वरिष्ठ नेतेही राहुल  गांधी यांच्या हाती काँग्रेसची धुरा सोपविण्यात यावी म्हणून आग्रही आहेत. जी-२३ सूमहातील नेत्यांकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल यांच्याविरोधात उतरविण्यासारखा एकही नेता नाही.

विशेष म्हणजे अंसतुष्टांच्या गोटात फूट पडल्याने आनंद शर्मा, कपिल सिब्बल, विवेक तन्खा यांच्यासारखे नेते एकाकी पडल्याचे दिसते. 

Web Title: Sonia Gandhi will now change the face of the congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.