'अमित शाह यांच्या टेबलवर सोनिया-राहुल गांधींची फाईल; लवकरच रद्द होईल नागरिकत्व'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:21 AM2020-02-22T10:21:22+5:302020-02-22T10:22:39+5:30
पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून येणाऱ्या मुस्लिमांना नागरिकता देण्यासाठी आग्रह करणे हास्यास्पद असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप खासदार सुब्रमण्याम स्वामी यांनी दावा केला की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नागरिकत्व लवकरच रद्द होईल. हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या नागरिकत्वाची फाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टेबलवर आहे. ते लवकरच भारतीय नागरिकत्व गमावतील, असा टोला स्वामी यांनी लगावला. भारतीय संविधानाचा हवाला देत ते म्हणाले की, जे लोक भारतीय असताना इतर देशांचं नागरिकत्व घेतात, त्यांच नागरिकत्व रद्द होणार आहे.
स्वामी यांनी दावा केला की, राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये व्यवसाय सुरू कऱण्यासाठी तेथील नागरिकत्व स्वीकारले होते. मात्र राहुल गांधी भारताच्या नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील राजीव गांधी भारतीय होते. मात्र सोनिया गांधी यांची प्रतिष्ठा पाहता राहुल गांधी असं करणार नाहीत, असंही स्वामी यांनी सांगितले.
नागरिकता सुधारणा विधेयकावरून सुरू असलेल्या गदारोळावर त्यांनी प्रकाश टाकला. नागरिकता सुधारणा कायदा समजून घेण्यात आला नाही. याचा विरोध करणाऱ्यांना देखील कायद्याची माहिती नाही. भारतीय मुस्लिमांना या कायद्यामुळे काहीही अडचण होणार नसून तसा तर्क करणे हास्यास्पद असल्याचे स्वामी यांनी नमूद केले. तसेच पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून येणाऱ्या मुस्लिमांना नागरिकता देण्यासाठी आग्रह करणे हास्यास्पद असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.