महाआघाडी बनवण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना सुरुंग? या राज्यात बसपा स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:58 AM2018-06-18T10:58:33+5:302018-06-18T10:58:33+5:30
2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार देत बहुजन समाज पक्षाने राज्यातील सर्व 230 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मात्रा काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी होण्याची अद्यापही आशा असून, निवडणुकीस अद्याप उशीर आहे. तसेच आम्ही समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू इच्छितो, असे काँग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी सांगितले.
बसपाचे मध्य प्रदेश अध्यक्ष नर्मदा प्रसाद अहिरवार यांनी सांगितले की, "पुढील निवडणुकीत बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसची चर्चा सुरू आहे, असे काँग्रेसचे नेते सांगत असल्याचे मला प्रसारमाध्यमांकडून समजले. मात्र अशा आघाडीसाठी राज्य स्तरावर आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, तसेच माझ्या माहितीप्रमाणे केंद्रीय पातळीवरही अशी चर्चा झालेली नाही. काँग्रेससोबत आघाडीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून मला कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत आम्ही राज्यातील सर्व 230 जागांवर निवडणूक लढवणारा आहोत."
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रसारमाध्यमप्रमुख माणक अग्रवाल यांनी राज्यात आघाडी करण्यासाठी बसपाचे नावच घेतले नसल्याचा दावा केला आहे."आघाडीसाठी आम्ही कुठल्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. काँग्रेस पक्ष मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करेल, असे आमच्या पक्षाकडून सांगण्यात आले होते. आम्ही बसपाचे नाव कधीही घेतलेले नाही.