राज्य पातळीवरच काँग्रेस करणार समझोते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:21 AM2018-07-27T01:21:12+5:302018-07-27T07:00:15+5:30
नेतृत्वाच्या वादामुळे राष्ट्रीय आघाडी अशक्य
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय पाळीवर नव्हे, तर राज्य स्तरावरच विविध पक्षांशी काँग्रेस समझोते करणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैटकीत यावर चर्चा झाल्यानंतर आघाड्यांसाठी जी समिती स्थापन केली आहे, तिने राष्ट्रीय पातळीवर समझोते करणे पक्षाच्या हिताचे नाही, असे काँग्रेस नेतृत्वाला सांगितले आहे.
निवडणुकांचे जे निकाल येतील, त्याआधारेच काँग्रेसप्रणित आघाडीचा नेता निश्चित करावा, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या नेतृत्वाबाबत बसपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये, जागांबाबत मायवती यांनी केलेले विधान यानंतर राहुल गांधी यांनी अद्याप महाआघाडीच न झाल्याने तिचे नेतृत्व कोण करेल, याची चर्चा करण्यात अर्थ नाही, प्रादेशिक पक्षालाही नेतृत्व मिळू शकते, असेही या नेत्याने स्पष्ट केले.
आघाडीचे नेतृत्व आपल्या नेत्याला मिळावे, असे मत व्यक्त करायला प्रादेशिक पक्षांनी सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी ममता बॅनर्जी यांचे, तर बसपाने मायावती यांचे नाव पुढे केले आहे. समाजवादी पक्षाने मुलायम सिंग यादव नेते असावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने विविध राज्यांतील आपली ताकद पाहून प्रादेशिक पातळीवर आघाड्या करण्याचे ठरविले आहे.
तृणमूल काँग्रेसशी समझोता अशक्यच
तेलगू देसम यांच्याशी समझोता व्हावा, असाही काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर मध्य प्रदेशात बसपाशी, बिहारमध्ये राजदशी, उत्तर प्रदेशात बसपा व सपा यांच्याशी, आसाममध्ये बजरुद्दिन अजमल यांच्या नेतृत्वाखालील एआययूडीएफशी तर पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी समझोत्याचा प्रश्न उद्भावत नाही, असे ‘लोकमत’ला सांगितले. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनीही तृणमूलशी समझोता होणे अवघड असल्याचे म्हटले आहे.