राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची जोरदार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 04:57 AM2020-07-12T04:57:50+5:302020-07-12T06:25:54+5:30
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची एक बैठक शनिवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे देण्याची मागणी शनिवारी एका बैठकीत अचानक करण्यात आली. ज्येष्ठ काँग्रेस नेते ए.के. अँटोनी यांनीही या मागणीचे जोरदार समर्थन केले.
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांची एक बैठक शनिवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना आणण्याची जोरदार मागणी करण्यात आली. राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांत कोडिकुन्नील सुरेश (केरळ), मनिक्कम टागोर (तामिळनाडू), गौरव गोगोई व अब्दुल खलिक (आसाम), मोहंमद जावेद (बिहार) आणि सप्तगिरी शंकर उलाका (ओडिशा) यांचा समावेश आहे. या मागणीला ए.के. अँटोनी यांनीही जोरदार पाठिंबा दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे अँटोनी यांनी सांगितले.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी हेही या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांनी मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याआधी जेव्हा-जेव्हा अशी मागणी समोर आली तेव्हा-तेव्हा ते नकार देत आले आहेत. यावेळी मात्र ते काहीच बोलले नाहीत.
गेल्या महिन्यात काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर काही नेत्यांनी अशीच मागणी केली होती.
२0१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला होता. १0 आॅगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक लवकरच होण्याची शक्यता असून, या बैठकीत यासंबंधीचा ठराव येऊ शकतो.