MP Crisis: कमलनाथ जाणार; 'कमळ' उमलणार?; मध्य प्रदेशात उद्याच बहुमत चाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:43 PM2020-03-19T19:43:46+5:302020-03-19T19:46:24+5:30
MP Crisis मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढल्या; उद्याच बहुमत चाचणी होणार
नवी दिल्ली: ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करताच पक्षाच्या २२ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं संकटात सापडलेल्या कमलनाथ सरकारला आज सर्वोच्च धक्का बसला आहे. मध्य प्रदेश विधानसभेत उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. उद्या संध्याकाळी पाच वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होईल. विधानसभेत त्वरित विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, अशी मागणी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याचिकेद्वारे केली होती.
काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात आलंय. त्यामुळे बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी चौहान यांनी केली होती. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसच्या बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुचवलं. तसं झाल्यास न्यायालय एखादा निरीक्षक नेमू शकेल, असं न्यायमूर्तींनी पुढे म्हटलं. मात्र विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडणाऱ्या अभिषेक मनु सिंघवींनी ही सूचना अमान्य केली.
मध्य प्रदेश विधानसभेतील बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या चौहान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दोन दिवस सुनावणी झाली. यानंतर उद्या संध्याकाळी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असे आदेश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठानं दिले. बहुमत चाचणीदरम्यान आमदारांना हात उंचावून मतदान करावं लागेल. याशिवाय विधानसभेतल्या घडामोडींचं चित्रीकरणदेखील केलं जाईल.
विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान सुरू असताना परिस्थिती नियंत्रणात राहील याची खबरदारी संबंधित यंत्रणेनं घ्यावी. बंडखोर आमदार विधानसभेत येत असताना त्यांचा रस्ता कोणीही अडवणार नाही, त्यांना पुरेशी सुरक्षा मिळेल, याची काळजी डीजीपींनी घ्यावी, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. त्यामुळे उद्या मध्य प्रदेशात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.