'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:47 PM2019-04-23T13:47:03+5:302019-04-23T13:47:51+5:30
राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे.
नवी दिल्ली - चौकीदार चोर है या विधानावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. राफेल प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी आता कोर्टानेही म्हटलं चौकीदार चोर है असं विधान केलं होतं. याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींचे विधान हे कोर्टाचा अवमान असल्याने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांनी आपण केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही त्यामुळे मीनाक्षी लेखी यांनी आक्षेप घेतला. मंगळवारी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी मीनाक्षी लेखी यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे.
राफेल प्रकरणात सुनावणीच्या दरम्यान भ्रष्टाचाराबाबत राफेलची लीक झालेली कागदपत्रे ग्राह्य धरली जातील असं सुप्रीम कोर्टाने सांगितले होतं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना आता कोर्टानेही मानलं आहे की, चौकीदार चोर हे अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यांच्या या विधानावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानेही राहुल गांधी यांच्या विधानावरुन अवमान नोटीस पाठवली होती. त्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र नुसतं दिलगिरी व्यक्त करण्यावर भाजपाचं समाधान झालं नाही. राहुल गांधी यांनी दिलेल्या उत्तरामध्ये वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आतापर्यंत राहुल गांधी यांनी दिलेलं उत्तर वाचलं नाही. मुकुल रोहतगी यांना राहुल गांधींनी दिलेलं उत्तर कोर्टात वाचून दाखवावं असं सरन्यायाधीशांनी सांगितले.
हे उत्तर वाचून दाखवताना मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. राहुल गांधी आपली चूक झाल्याचं कबुल केलं मात्र या उत्तरात कुठेही माफी मागितली नाही. या दरम्यान सरन्यायाधीशांनी चौकीदार कोण आहे? असा प्रश्न मुकुल रोहतगी यांना केला. त्यावेळी रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी पूर्ण देशाला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार चोर है, मात्र यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही टिप्पणी केली नाही. या प्रकरणावर सुनावणी पुढील 30 एप्रिल रोजी पुन्हा करण्यात येणार आहे.