आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:31 AM2023-11-26T06:31:31+5:302023-11-26T07:23:40+5:30

Telangana Assembly Election 2023: तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली.

Telangana Assembly Election 2023: Now all eyes are on Telangana | आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील मतदान आटोपल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपला मोर्चा तेलंगाणाकडे वळवला आहे. ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.  २ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत.  

बीआरएस सरकारचे जाणे अटळ : मोदी
कामारेड्डी (तेलंगणा) -  तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली. पंतप्रधानांनी यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली. 
प्रचारसभेत मोदी म्हणाले की, जनतेने आमचे काम पाहिले आहे. दिलेले आश्वासन भाजपकडून पूर्ण केले जाते. आम्ही वचन दिले होते तीन तलाख प्रथा संपवून टाकू. पुढे आम्ही ते करून दाखवले. कलम ३७० रद्द करणार, महिलांना आरक्षण देणार याचा शब्द भाजपने दिला होता. आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शनचा शब्द दिला होता. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मंदिर बांधण्याचे काम आज सुरु आहे. तेलंगणाला दिलेली विविध आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. (वृत्तसंस्था) 

१० वर्षे केवळ भ्रष्टाचार : शाह
हैदराबाद : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत केवळ भ्रष्टाचार केला. तेलंगणातील जनता बीआरएस सरकारला सत्तेवरून हटविण्यासाठी सज्ज आहे. आज तरुण, शेतकरी, दलित व मागासवर्गीय लोक पूर्णपणे निराश झाले आहेत. तेलंगणात केवळ भाजपच बदल घडवून आणू शकतो, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केला. 
येथे पत्रकारांना संबोधित करताना शाह म्हणाले की, एमआयएम आणि काँग्रेसचा इतिहास दर्शवितो की, दोन्ही पक्षांनी बीआरएसला पाठिंबा दिला होता. जेव्हाही (असदुद्दीन) ओवेसी आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी बीआरएसला पाठिंबा दिला. तसेच निवडून आलेले काँग्रेसचे आमदार बीआरएसमध्ये दाखल झाले. याचा अर्थ, राज्यातील सत्ता परिवर्तनासाठी तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच वाया जाईल. (वृत्तसंस्था)

परिवाराकडे मलाई देणारी खाती : राहुल
निजामाबाद : केसीआर यांच्या परिवाराकडे सर्वाधिक कमाई करून देणारी मंत्रालये होती. जमीन, मद्य आणि खाणी यामधून सर्वाधिक पैसा मिळवला जातो. जर तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता तर ही तिन्ही मंत्रालये तुमच्या परिवाराकडे दिलीच नसती. दलित बंधू योजनेसाठी केसीआर यांचे आमदार तीन लाखांचे कमिशन घेतात, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत केला. 
३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. 
२ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने या खेपेला आक्रमक प्रचार केला आहे. 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी  प्रचारसभेत आरोप केला होता की, केसीआर यांनी तेलंगणाला लुबाडले आहे. मुख्यमंत्री आता दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही टीका करू लागले आहेत. (वृत्तसंस्था)

पैशांसाठी त्यांना हवी सत्ता : प्रियंका
माधिरा (तेलंगणा) : आपल्या परिवारासाठी गडगंज पैसा कमावण्यासाठी केसीआर यांना काहीही करून सत्तेत राहायचे आहे. निवडणूक जवळ आली की त्यांना जनतेची आठवण होते, अशी टीका काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी माधिरा येथील प्रचारसभेत केली. 
प्रियंका गांधी म्हणाल्या की, जनतेने तेलंगणा या राज्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. अनेक घरांतील माता-भगिनींनी राज्यासाठी बलिदान दिले आहे. आज येथील जनता कमालीच्या अडचणींचा सामना करीत आहे. ज्या गोष्टींची आम्ही खात्री देतो, त्यांची आम्ही पूर्तता करतो. तेलंगणात सध्या केवळ नेत्यांच्या फायद्यासाठी राजकारण सुरू आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. स्वतंत्र भारतातील राजकारणाची परंपरा महात्मा गांधीजींनी सुरू केली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही परंपरा पुढे चालवली. देशाची जनता सर्वतोपरी आहे, अशी आमच्या नेत्यांची धारणा आहे. (वृत्तसंस्था) 

Web Title: Telangana Assembly Election 2023: Now all eyes are on Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.