काँग्रेस आणि तृणमूलमधील तणाव वाढला, राहुल गांधींच्या यात्रेचे पोस्टर फाडले, ममता त्याच दिवशी घेणार रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:17 PM2024-01-24T17:17:50+5:302024-01-24T17:18:52+5:30
Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर निघाले आहेत. मणिपूरमधून निघालेली त्यांची ही यात्रा थोड्याच दिवसात आसाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. मात्र ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. तसेच तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे. या घोषणेनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. तसेच बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचे काही पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर फाडण्यात आले आहेत. मात्र हे पोस्टर कुणी फाडले, याबाबतची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार आहे. मात्र ही यात्रा कोलकाता येथे जाणार नाही.
गुरुवारी पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दाखल होणार आहे. याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपल्या रॅलीचं आयोजन केलं आहे. ममता बॅनर्जींनी आरोप केला की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण आतापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत. मात्र असं असूनही राहुल गांधींच्या यात्रेबाबत आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. तसेच पश्चिम बंगालशी संबंधित कुठल्याही गोष्टीबाबत आमच्यासोबत चर्चा झाली नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कांग्रेसला मोठा धक्का देताना राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. बंगालमध्ये कुठल्याही पक्षात ताळमेळ जुळलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरेल. मी दिलेला कुठलाही प्रस्ताव इंडिया आघाडीने मान्य केलेला नाही. त्यामुळे आमचा पक्ष स्वबळावर निवडणुकीत लढणार आहे.