राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खलिस्तानला पाठिंबा मिळेल, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:29 AM2024-09-16T10:29:49+5:302024-09-16T10:30:47+5:30
Gurpatwant Singh Pannu News: अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी भारतातील शीख समाजाच्या स्थितीबाबतही एक विधान केलं होतं. त्यातील ठरावीक भागाचा संदर्भ देत खलिस्तानी दहशतवाद्यांनी नव्या वादला तोंड फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. याच अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी भारतातील शीख समाजाच्या स्थितीबाबतही एक विधान केलं होतं. त्यातील ठरावीक भागाचा संदर्भ देत खलिस्तानी दहशतवाद्यांनी नव्या वादला तोंड फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी यांच्या विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे तथ्यात्मक दृष्ट्या खरं विधान केलं आहे. त्यात त्यांनी भारतामध्ये शिखांच्या अस्तित्वाला संकटांचा सामना करावा लागत असल्याचं मान्य केलं आहे. ही बाबत खलिस्तानसाठीच्या जनमत संग्रहासाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच पंजाबच्या स्वातंत्र्यासाठीच्या समर्थनामध्ये वाढ करेल. मात्र राहुल गांधी यांनी ते खलिस्तानचं समर्थन करत असल्याचं कधीही म्हटलेलं नव्हतं.
पाकिस्तानमधील जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार पन्नू यांनी सांगितले की, भाजपा आणि आरएसएसचे सदस्य हे वास्तव मान्य केल्याने राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. ते शीख, पंजाब आणि खलिस्तान यांचे शत्रू आहेत. राहुल गांधी यांनी भारतामध्ये शीखांच्या होत असलेल्या शोषणाची माहिती काँग्रेसच्या सदस्यांना दिली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिेकेतील एका भाषणात म्हटले होते की, भारतामध्ये एका शीख व्यक्तीला त्याची पगडी आणि कडं परिधान करण्याची परवानगी दिली जाईल का, याबाबत लढाई सुरू आहे. तसेच ती व्यक्ती एक शीख म्हणून गुरुद्वारामध्ये जाण्यास सक्षम असेल का? हाच संघर्ष आहे आणि तो सर्व धर्मांसाठी आहे.
याच विधानाचा आधार घेत गुरपतवंत सिंग पन्नू म्हणाला की, राहुल गांधी यांनी केलेलं विधान हे केवळ खलिस्तानच्या जनमत संग्रहाला योग्य ठरवत नाही तर पंजाब हे भारतापासून वेगळे होण्याच्या मार्गावर असल्याच्या काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना झालेल्या जाणिवेलाही दर्शवते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतामध्ये शिखांना अस्तित्वाचा सामना करावा लागत आहे, हे काँग्रेसने मान्य केलं आहे, याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला आहे. त्यांनी अमेरिकन खासदार इल्हान ओमार यांची भेट घेतली होती, त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर राहुल गांधी हे भारतविरोधी शक्तींच्या भेटीगाठी घेत असल्याचा आरोप भाजपाने केला होता. इल्हान ओमार या पाकिस्तानधार्जिण्या मानल्या जातात. तसेच त्या वारंवार भारताविरोधात वक्तव्यं करत असतात.