"21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात"; राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:56 PM2024-07-29T14:56:04+5:302024-07-29T14:58:00+5:30
राहुल गांधी म्हणाले, दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. आपण अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय केले? यामुळे एका तरुणाला रोजगार मिळणार नाही.
जे अभिमन्यूसोबत करण्यात आले होते, ते भारतातील जनतेसोबत करण्यात येत आहे. चक्रव्यूहाचे आणखी एक रूप असते पद्मव्यूह, जे कमळासारखे असते, जे मोदीजी आपल्या छातीवर लावून चालतात. हे व्यूह मोदीजी, अमित शाहजी, मोहन भागवतजी, अजित डोभालजी, अंबानीजी, अदानीजी कंट्रोल करत आहेत. 21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, असे म्हणत आज राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते.
राहुल गांधींच्या विधानानंतर, सत्तापक्षातील सदस्यांनी गदारोळ सुरू केला. यावर स्पीकर ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना टोकले आणि म्हणाले की, आपल्या सदस्यांनीही म्हटले आहे की, जे सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांचे नाव जायला नको. यावर राहुल गांधी म्हणाले, आपण म्हणत आहात तर, एनएसए, अंबानी आणि अदानी यांचे नाव काढून टाकतो.
आपण तरुणांना चक्रव्यूहात अडकवलं-
राहुल गांधी म्हणाले, "दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. आपण अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय केले? यामुळे एका तरुणाला रोजगार मिळणार नाही. हा इंटर्नशिप कार्यक्रम म्हणजे जोक आहे. कारण तुम्ही म्हणालात की, इंटर्नशिप देशातील टॉप 500 कंपन्यांमध्येच होईल. आधी तरूणाचा पाय तोडला आणि नंतर मलमपट्टी करत आहात."
सैन्यातील जवानांनाही अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले -
"आपण तरुणांना एकीकडे पेपरलीक, तर दुसऱ्याबाजूला बेरोजगारीच्या चक्रव्यूहात अडकवले आहे. 10 वर्षांत 70 वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र पेपेर फुटीसंदर्भात अर्थसंकल्पात एकदाही बोलले गेले नाही. अर्थसंकल्पात शिक्षणासाठी जो पैसा द्यायला हवा होता, तोही दिला गेला नाही. तर दुसऱ्या बाजूला आपण सैन्यातील जवानांनाही अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले आहे. अग्निवीरसाठी एक रुपयाही दिला नाही," असेही राहुल गांधी यावेली म्हणाले.