काँग्रेसचे अध्यक्षपद तूर्त सोनिया गांधी यांच्याकडेच; संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सांभाळणार जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:25 AM2022-03-14T06:25:45+5:302022-03-14T06:27:15+5:30

नवीन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या दिशेने पक्ष तयारी करणार आहे.

The presidency of the Congress now belongs to Sonia Gandhi | काँग्रेसचे अध्यक्षपद तूर्त सोनिया गांधी यांच्याकडेच; संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सांभाळणार जबाबदारी

काँग्रेसचे अध्यक्षपद तूर्त सोनिया गांधी यांच्याकडेच; संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सांभाळणार जबाबदारी

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील दारूण पराभवाची चिकित्सा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, यावर एकमत झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच नेतृत्वाबाबत तक्रार असल्यास पद सोडण्याची तयारी असल्याचे सोनियांनी सूचित केले. परंतु कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले.

नवीन अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या दिशेने पक्ष तयारी करणार आहे. तत्पूर्वी, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाचे चिंतन शिबिर आयोजित केले जाणार आहे. याच महिन्यात कार्यकारिणीच्या सदस्यांची आणखी एक बैठक होणार असून त्यात पुन्हा एकदा निवडणुकीतील पराभवाची चिकित्सा केली जाणार आहे.

बैठकीनंतर सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी पक्ष आतापासून तयारीला लागणार आहे, जेणेकरून आव्हानांचा मुकाबला करता यावा. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, इंदिरा गांधी ते राहुल गांधी यांच्यापर्यंत मी पक्षासाठी काम केले आहे. नेतृत्वावरून माझा विरोध नव्हताच. निष्ठावंत असल्याने पक्षसंघटना बळकट कशी करता येईल, हे मला सांगणे जरुरी आहे.

आनंद शर्मा म्हणाले की, मी काँग्रेससोबत असून कोणत्याही स्थितीत पक्ष सोडणार नाही. संघटनेत होयबांचा बोलबाला असल्याची माझी तक्रार होती. त्यांच्या तावडीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी एक ठोस रणनीती आखावी लागेल. तरच भाजपचा मुकाबला करता येईल.
अन्य काही सदस्यांनी असे मत मांडले की, काँग्रेस आाणि भाजपदरम्यान विचारधारेचा लढा आहे. हा लढा जिंकण्यासाठी कठोर मेहनत आणि वेळ लागतो. तेव्हा हताश होण्याची गरज नाही.

हरीश चौधरी आणि अजय माकन यांनी पंजाब निवडणुकीचा अहवाल सादर केला. देवेंद्र यादव आणि हरीश सावंत यांनी उत्तराखंड, दिनेश गुंडू राव आणि पी. चिदम्बरम यांनी गोव्याचा, भक्त चरणदास आणि जयराम रमेश यांनी मणिपूरशी संबंधित आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि भूपेश बघेल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अहवाल बैठकीत सादर केला. अंतर्गत गटबाजीसोबत निवडणुकीतील पराभवामागची कारणे यात नमूद केली आहेत.

Web Title: The presidency of the Congress now belongs to Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.