'सावरकर प्रकरण आता बंद झाले, पण...', काँग्रेसने भाजपसमोर ठेवली एक मोठी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:42 PM2022-11-23T17:42:47+5:302022-11-23T17:43:49+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन देशातील राजकारण पुन्हा तापले आहे. एकीकडे भाजपवाले सावरकरांना महान क्रांतिकारक म्हणून पाहतात, तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांसमोर पराभव स्वीकारला आणि माफी मागितली असा काँग्रेसचा दावा आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपसमोर एक अट ठेवली आहे. भाजपच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांवर भाष्य करू नये, आम्हीही त्यांच्या नेत्यांचे सत्य जगासमोर आणणार नाहीत, अशी अट काँग्रेसने ठेवली आहे.
काँग्रेसने काय अट घातली?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावरकर प्रकरण आता बंद झाल्याचे म्हटले आहे. भाजप आणि संघाच्या लोकांनी आमच्या नेत्यांबद्दल खोटे पसरवणे थांबवावे. त्यांच्या नेत्यांची सत्यताही आम्ही सर्वांसमोर मांडणार नाही. आता इथे जयराम रमेश यांनी ते कोणत्या नेत्यांबद्दल बोलत आहेत, हे स्पष्ट केले नाही. पण भाजपचे जुने हल्ले लक्षात घेता, इथे ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी अशा नेत्यांबद्दल बोलत आहेत, असे जाणून येते.
काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका विधानाने सावरकर वादाला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल अनेक दावे केले होते. सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचे ते म्हणाले होते. देशात एका बाजूला सावरकर आणि दुसरीकडे गांधी यांच्या विचारांची लढाई सुरू आहे. माझे मत आहे की सावरकरांनी भीतीपोटी पत्रावर सही केली, तर नेहरू, पटेल, गांधी वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. सावरकरांनी पत्रावर स्वाक्षरी करणे, हा भारतातील सर्व नेत्यांचा विश्वासघात होता, अशी टीका राहुल यांनी केली होती.
उद्धव यांनी निशाणा साधला होता
राहुल यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि भाजप लगेच आक्रमक झाला. भाजपसोबतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही राहुल गांधींच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते. वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे उद्धव म्हणाले होते. वीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे, त्यांचे योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही, असे ते म्हणाले.