Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:52 PM2023-01-29T23:52:16+5:302023-01-29T23:52:38+5:30
चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.
काँग्रेसचीभारत जोडो यात्रा रविवारी श्रीनगर येथे पोहोचली आहे. येथे यात्रेचे संयोजक राहुल गांधी यांनी तिरंगा ध्वज फडकावला. यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांना खुले आव्हान दिले. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग आणि ब्लास्ट होत आहेत. जर सुरक्षा व्यवस्था एवढी चांगली असेल, तर भाजप, लाल चौकातून जम्मूपर्यंत यात्रा का करत नाही. गृह मंत्री अमित शाह जम्मू ते काश्मीरपर्यंत पदयात्रा का करत नाहीत? येथील सुरक्षा व्यवस्था ठीक आहे, असे मला वाटत नाही.
चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, मी निवृत्त सैनिक आणि लडाखमधील जनतेची भेट घेतली. ते म्हणाले की चीनने आपली 2000 चौरस किमी जमीन घेतली आहे. भारतातील अनेक पेट्रोलियम केंद्रांवरही चीनने ताबा घेतला आहे. सरकारने या गोष्टी नाकारणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे चीनचे मनोबल आणखी वाढेल.
यावेळी राहुल गांधींनी विरोधकांच्या एक्यासंदर्भातही भाष्य केले. विरोधी पक्षांमध्ये जी एकता येते, ती बोलण्यातून येते. विरोधक विखुरले आहेत असे म्हणणे योग्य नाही. विरोधकांमध्ये मतभेद नक्कीच आहेत, पण विरोधक एकत्र लढतील. ही विचारधारेची लढाई आहे. एका बाजूला आरएसएस-भाजप आहे, तर दुसऱ्या बाजूला बिगर आरएसएस-भाजपवाले आहेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे.
LIVE: Press briefing by Shri @RahulGandhi in Srinagar, Jammu & Kashmir. #BharatJodoYatrahttps://t.co/D5JmAbxpYD
— Congress (@INCIndia) January 29, 2023
यात्रा येथेच संपत नाही, ही तर सुरुवात -
यावेळी राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेसंदर्भातील आपले अनुभवही सांगितले. ते म्हणाले, या यात्रेचा भारतीय राजकारणावर प्रभाव पडेल, पण हा काय असेल हे मी सांगू शकत नाही. ते म्हणाले, या यात्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. लोकांना एकत्र आणणे आणि द्वेष संपवणे, असा या यात्रेचा उद्देश होता. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर हा माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अनुभव आहे. यात्रा येथेच संपत नाही, तर हे पहिले पाऊल आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.