राहुल गांधी राजीनामा मागे घेण्याची अजिबात शक्यता नाही -वीरप्पा मोईली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:49 AM2019-06-29T04:49:25+5:302019-06-29T04:49:49+5:30
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची एक टक्केही शक्यता नाही, त्यामुळे पक्ष कार्यकारिणीला पुढील निर्णय घ्यावाच लागेल
हैदराबाद - राहुल गांधीकाँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची एक टक्केही शक्यता नाही, त्यामुळे पक्ष कार्यकारिणीला पुढील निर्णय घ्यावाच लागेल, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शशी थरूर यांच्यासह काही खासदारांनी त्यांना विनंती केली होती. मात्र, ती त्यांनी अमान्य केली होती. अध्यक्षपदी न राहण्याच्या आपल्या निर्णयावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे या विषयावर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे वीरप्पा मोईली म्हणाले. ते म्हणाले की, राजकारणात काहीही घडू शकते. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्याने नवा अध्यक्ष ठरवण्याआधी कार्यकारिणी परिस्थितीवर विचार करील. (वृत्तसंस्था)
प्रियांकांकडे सूत्रे सोपविण्याबाबत मौन
राहुल गांधी यांना अध्यक्षपदी राहायचे नसेल तर त्यांनी पक्षाची सारी सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपवावीत, अशी विनंती काही काँग्रेस नेत्यांनी केली आहेत. त्याबद्दल कोणतेही भाष्य करण्यास वीरप्पा मोईली यांनी नकार दिला. काँग्रेस कार्यकारिणीच्या आगामी बैठकीत काय निर्णय होतो याची आपण वाट पाहू या, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या सणसणीत पराभवानंतर काँग्रेसवर मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, असे विधान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी गेल्याच आठवड्यात केले होते.