...म्हणून भारताच्या लोकसंख्येची जातिनिहाय आकडेवारी समजणे आवश्यक, राहुल गांधींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:19 PM2023-10-02T16:19:47+5:302023-10-02T16:20:12+5:30
Rahul Gandhi: बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर आता या आकडेवारीवरून राजकारण पेटले आहे.
बिहार सरकारने केलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानंतर आता या आकडेवारीवरून राजकारण पेटले आहे. एकीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत ज्यांची जेवढी संख्या त्यांना तेवढं हिस्सा मिळाला पाहिजे असं विधान केलं आहे. तर आता राहुल गांधी यांनीही जातिनिहाय जनगणनेबाबत मोठं विधान केलं आहे. जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क हा आमचा पण आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी सांगितले की, बिहारच्या जातिनिहाय जनगणनेमधून समजले की, बिहारमध्ये ओबीसी+एससी+एसटी यांची एकूण संख्या ८४ टक्के आहे. मात्र केंद्र सरकारच्या ९० सचिवांमध्ये केवळ ३ ओबीसी आहेत. ते भारताचं केवळ ५ टक्के बजेट सांभाळतात. त्यामुळे भारताची जातिनिहाय लोकसंख्या कळणे आवश्य आहे. जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क हे आमचे वचन आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
बिहार की जातिगत जनगणना से पता चला है कि वहां OBC + SC + ST 84% हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 2, 2023
केंद्र सरकार के 90 सचिवों में सिर्फ़ 3 OBC हैं, जो भारत का मात्र 5% बजट संभालते हैं!
इसलिए, भारत के जातिगत आंकड़े जानना ज़रूरी है। जितनी आबादी, उतना हक़ - ये हमारा प्रण है।
बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार राज्यात राजपूत ३.४५% यादव १४%, भूमिहार २.८६%, ब्राह्मण ३.६५% आणि नौनिया १.९% एवढे आहेत. बिहारमधील जातिनिहाय जनगणनेनुसार राज्यात मागासवर्गीय (३ कोटी ५४ लाख ६३ हजार ९३६) २७.१२ टक्के, अतिमागास वर्गीय (४ कोटी ७० लाख, ८० हजार ५१४) ३६.०१ टक्के, अनुसूचित जाती (२ कोटी ५६ लाख ८९ हजार ८२०) १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती (२१ लाख, ९९ हजार ३६१) १.६८ टक्के आणि अनारक्षित (२ कोटी २ लाख ९१ हजार ६७९) १५.५२ टक्के आहेत.
जातिनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार बिहारमध्ये हिंदू ८१.९९ टक्के, मुस्लिम १७.७० टक्के, ख्रिश्चन ०.०५ टक्के, शिख ०.०११ टक्के, बौद्ध ०.०८५१ टक्के, जैन ०.००९६ टक्के आणि इतर धर्मीय ०.१२७४ टक्के आहेत. त्याशिवाय ०.००१६ टक्के लोकांचा कुठलाही धर्म नाही आहे.