‘त्यांना AM-PM मधील फरकही कळत नाही, PMO कसं चालवणार?’ प्रणव मुखर्जींनी राहुल गांधींबाबत केलं होतं असं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:10 AM2023-12-07T09:10:20+5:302023-12-07T09:10:49+5:30
Pranab Mukherjee & Rahul Gandhi: देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले ‘प्रणव, माय फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे.
‘त्यांना AM-PM मधील फरकही कळत नाही, PMO कसं चालवणार?’ प्रणव मुखर्जींनीराहुल गांधींबाबत केलं होतं असं विधान
देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले ‘प्रणव, माय फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या पुस्तकाचं प्रकाशन ११ डिसेंबर रोजी प्रणव मुखर्जी यांच्या जयंती दिवशी होणार आहे. मात्र या पुस्तकातील काही उल्लेख प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले आहेत. त्यात काही धक्कादायक दावे करण्यात आलेले आहेत. विशेषकरून प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींबाबत केलेले मतप्रदर्शन धक्कादायक आहे.
या पुस्तकातील उल्लेखानुसार प्रणव मुखर्जी यांनी एकदा राहुल गांधींचं कार्यालय AM आणि PM मधील फरक समजू शकत नाही. त्यांच्याकडून भविष्यात PMO सांभाळण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो, असं मत व्यक्त केलं होतं. या पुस्तकात त्याबाबतच्या एका घटनेचा उल्लेख केलेला आहे. एके दिवशी सकाळी प्रणव मुखर्जी हे मुघल गार्डनमध्ये फिरत होते. तेव्हा राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी आले. प्रणव मुखर्जी यांना सकाळचं फिरणं आणि देवपूजा यामध्ये अडथळा आणलेला आवडत नसे. तरीही त्यांनी राहुल गांधींना भेटण्याचा निर्णय घेतला.
खरंतर राहुल गांधी हे प्रणव मुखर्जी यांना संध्याकाळी भेटणार होते. मात्र राहुल गांधींच्या कार्यालयाने चुकून ही बैठक सकाळी होणार असल्याचे राहुल गांधींना सांगितले. शर्मिष्ठा मुखर्जी पुस्तकात लिहितात की, ‘मी या प्रकाराबाबत जेव्हा माझे वडील प्रणव मुखर्जी यांना विचारलं तेव्हा ते उपहासात्मक टिप्पणी करत म्हणाले की, जर राहुल गांधींच्या कार्यालयाला AM आणि PM मधील फरक समजत नसेल तर त्यांच्याकडून भविष्यात पंतप्रधानांचं कार्यालय (PMO) चालवण्याची अपेक्षा कशी काय करता येऊ शकते’.
या पुस्तकामध्ये प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या मतप्रदर्शनाचा विस्तृतपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींना त्यांच्या टीममध्ये नव्या आणि जुन्या अशा दोन्ही पिढ्यांमधील नेत्यांना समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असेही या पुस्तकात म्हटले आहे. तसेच राहुल गांधींना नेहरू-गांधी कुटुंबातील असल्याचा अहंकार आहे. मात्र त्यांच्यासारखं राजकीय कौशल्य त्यांच्याकडे नाही, असंही प्रणव मुखर्जी एकदा म्हणाले होते, असाही या पुस्तकात उल्लेख आहे.