तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:48+5:302021-03-19T04:27:40+5:30
गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
कोळीकोड : आपल्याविरुद्ध अन्याय झाल्याचे सांगत केरळ विधानसभेच्या निवडणुकीत तीन महिलांनी प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यांचा विजय कितपत होईल, याची खात्री नसली तरी त्यांची उमेदवारी सर्वांच्या चर्चेचा विषय मात्र बनली आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांची ही बंडखोरी काँग्रेसला अडचणीत आणू शकेल. महिलांना काँग्रेसने पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्याच्या पलक्कड जिल्ह्यातील वायलर भागात १३ व १९ वर्षे वयाच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण व नंतर हत्या हे प्रकरण २०१७ साली खूप गाजले होते. पण, त्या प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे त्या दोन मुलींच्या आईने गेल्या महिन्यात डोक्याचे मुंडण केले, राज्यभर दौरे केले. आपल्या मुलींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकल्याचा तिचा आरोप आहे. तिनेे धर्मदाममध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काँग्रेसने तिथे उमेदवार न देता या महिलेला पाठिंबा दिला आहे.
आघाडीची पंचाईत
- क्रांतिकारक मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाचे नेते टी. पी. चंद्रशेखरन यांची २०१२ झाली हत्या झाली होती. अद्याप त्या प्रकरणातील आरोपींनाही शिक्षा झालेली नाही.
- त्यामुळे त्यांच्या पत्नी के. के. रेमा यांनी वडकारामधून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यांनाही काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे डाव्या आघाडीच्या उमेदवाराची तिथे पंचाईत होईल.