"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:29 PM2024-11-25T16:29:22+5:302024-11-25T16:31:16+5:30
महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे.
INDIA Alliance : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा असा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत इंडिया आघाडीबद्दत महत्त्वाचे विधान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बंगालमधील सर्व 6 विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याने त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अशातच महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून घोषित करावे, असे तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीला कणखर आणि निर्णायक नेतृत्वाची गरज असल्याचे बॅनर्जी म्हणाले.
ममता बॅनर्जी यांच्याकडे मजबूत नेतृत्व आहे. तसेच, त्यांच्या तळागाळातील संपर्कामुळे त्या इंडिया आघाडीसाठी सर्वात प्रभावी व्यक्ती बनल्या आहेत, असा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागेल. आता वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा एकतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यांनी आपला अहंकार सोडून ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीच्या गटनेत्या म्हणून स्वीकारावे," असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
"ममतांची देशात सेनानी म्हणून ओळख आहे. त्यांचे नेतृत्व आणि जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता त्यांना एक आदर्श चेहरा बनवते. त्यामुळे एकजूट आणि व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता विरोधकांचे प्रयत्न फोल ठरतील," असेही बॅनर्जी म्हणाले.