'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 05:07 PM2024-11-26T17:07:18+5:302024-11-26T17:07:53+5:30
TMC Raises Question On Rahul Gandhi: ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा करण्याची मागणी तृणमूलने केली आहे.
TMC Attack On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) च्या पराभवाचा परिणाम इंडिया आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ममत बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने तर थेट राहुल गांधींच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राहुल गांधींना कमकुवत नेता म्हटले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'हरियाणा किंवा महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही. भाजपच्या विरोधात लढण्यात काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसने सर्व प्रयोग केले, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आता त्यांना एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे.'
#WATCH | Delhi | TMC MP Kalyan Banerjee says, "...The Congress has failed to achieve the desired result either in Haryana or in Maharashtra. We had tremendous hope from the Congress that they would do better. INDIA alliance is there but the expected result could not be achieved.… pic.twitter.com/XojS2ibSsd
— ANI (@ANI) November 26, 2024
टीएमसी इंडिया आघाडीच्या बैठकीतून दूर
दरम्यान, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत टीएमसी खासदार सहभागी झाले नव्हते. विशेष म्हणजे, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचा प्रमुख बनवण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस अन् तृणमूलमध्ये तुतू मैमै सुरू झाली आहे. काँग्रेसने आपला अहंकार दूर करावा आणि ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले होते.