"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 06:25 PM2024-11-29T18:25:43+5:302024-11-29T18:32:45+5:30

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात ...

Tough decisions will have to be taken Mallikarjun Kharge strict after crushing defeat in Haryana Maharashtra | "कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा केली. निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे खरगे यांनी बैठकीत स्पष्ट केले. जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि उणिवा दूर कराव्या लागतील. तीन राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचेही खरगे यांनी म्हटलं.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केलं. निवडणूक निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवरील आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा दूर करणे आवश्यक आहे, हे निकाल आपल्यासाठी संदेश आहेत, असं खरगे यांनी म्हटलं. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. पण दोघेही बैठकीच्या मध्येच निघून गेले. त्यामुळे आता याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

"परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील विधाने यामुळे आपले खूप नुकसान झालं आहे. आपण शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे आणि एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही आणि एकदिलाने निवडणुका लढवणार नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा होणार? प्रत्येकाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. काँग्रेस पक्षाचा विजय हा आमचा विजय आणि पक्षाचा पराभव हा आमचा पराभव आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पक्षाच्या ताकदीतच आमची ताकद आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.

यानंतर काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीतून बाहेर पडलेले दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत युती होणार नाही. पक्ष सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे, असं सांगितले. या बैठकीत ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे खरगे यांनी म्हटलं. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे खरगे म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी हरियाणामध्येही त्यांना आश्चर्यकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक राज्यांतील पक्षांतर्गत गटबाजीवरुन खरगे यांनी, जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा करायचा? असा सवाल केला आहे.
 

Web Title: Tough decisions will have to be taken Mallikarjun Kharge strict after crushing defeat in Haryana Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.