पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:22 AM2021-02-27T01:22:49+5:302021-02-27T06:54:01+5:30
केरळात डावे व काँग्रेस, तर तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकची लढाई
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांबरोबरच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर झाला असून, दक्षिणेकडील तिन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आसाममध्येही तीन टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. सर्व राज्यांतील मतमोजणी मात्र २ मे रोजीच होईल.
भारताचे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. यापैकी आसाममध्येच आसाम गण परिषदेच्या पाठिंब्याने भाजपचे सरकार आहे. अन्य चार राज्यांत भाजप सत्तेवर नाही. बंगालसाठी भाजपने सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीमध्ये भाजपला शिरकाव करणे वा पाय रोवणे शक्य होते का, हे पाहायला मिळणार आहे.
निवडणुकीपूर्वी लसीकरण हाेणार
- मतदानासाठी एका तासाचा अतिरिक्त वेळ.
- साेशल मीडियासाठी नव्या गाइडलाइन्सचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानुसार याेग्य कारवाई करू. साेशल मीडियावर नजर राहणार.
- सर्व निवडणूक कर्मचारी आघाडीच्या फळीतील याेद्धे असल्याचे गृहीत धरून त्यांचे लसीकरण प्राधान्याने केले जाईल.
पाच राज्यांत विधानसभेतील पक्षीय बलाबल
केरळ- एकूण जागा : १४०
सत्ताधारी डावी आघाडी : ९१
(माकप : ५८, भाकप : १९ आणि अन्य सहकारी : १४)
विरोधी आघाडी : ४३
(काँग्रेस : २१,
मुस्लीम लीग : १८ व अन्य सहकारी : ४)
आसाम एकूण जागा : १२६
सत्ताधारी आघाडी : ७४
भाजप : ६०,
आसाम गण परिषद : १३, इतर : १
काँग्रेस : १९
युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट : १४
इतर : बोडोलँड पीपल्स फ्रंट : ११
रिक्त जागा : ८
तामिळनाडू- एकूण जागा : २३४
अण्णा द्रमुक : १२४
द्रमुक : ९७
काँग्रेस : ०७
नियुक्त : १
इतर : १ आणि चार रिक्त
पश्चिम बंगाल एकूण जागा : २९४
तृणमूल काँग्रेस : २०९
व मित्रपक्ष : २
काँग्रेस : २३
डावी आघाडी : २३
(माकप : १९, फॉरवर्ड ब्लॉक : २, क्रांतिकारी समाजवादी पक्ष : २)
भाजप : २७
रिक्त जागा : १०
पुदुच्चेरी* एकूण जागा : ३०
(याशिवाय तीन राज्यपाल नियुक्त)
काँग्रेस : १५
एनआरसी : ८
द्रमुक : २
अण्णा द्रमुक : ४
अपक्ष : १
प. बंगालमध्ये सतत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचारही होत आहे. मतदान जसजसे जवळ येईल, तसे तेथील वातावरण बिघडू शकेल, हे गृहीत धरूनच बहुधा तिथे ८ टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. तृणमूलला पराभूत करून सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. ममता बॅनर्जी यांनीही पुन्हा विजयी होण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. राज्यात डावे पक्ष व काँग्रेस यांनी एकत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे.
केरळमध्ये डाव्या आघाडीच्या हातातील सत्ता स्वत:कडे घेण्यासाठी काँग्रेसने केरळमध्ये जोर लावला असून, राहुल गांधी
दौरे करीत आहेत. तिथे भाजपचा एकच आमदार आहे.
पुदुच्चेरीत ३० जागा असून, भाजपचा एकही आमदार नव्हता. पण, राज्यपालनियुक्त तिन्ही सदस्य भाजपचे होते. मात्र अण्णा द्रमुकच्या मदतीने तेथील सत्ता मिळविण्यासाठी भाजप नेते उत्सुक आहेत.
तामिळनाडूमध्येही मुख्य सामना सत्ताधारी अण्णा द्रमुक व द्रमुक यांच्यात असून, भाजपने अण्णा द्रमुकशी समझोता केला आहे. या समझोत्यातून भाजपला काही फायदा होणे शक्य आहे. तामिळनाडूमध्येही भाजपचा आमदार नाही.
आसाममध्ये सध्या भाजप व गण परिषद मिळून सरकार आहे. मात्र या वेळी भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी आसाम दौरा केला.
असा आहे पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रम...
तामिळनाडू विधानसभा निवडणूक
एकाच टप्प्यात निवडणूक होणार- ६ एप्रिल रोजी मतदान
आसाममध्ये विधानसभा निवडणूक
पहिला टप्पा - २७ मार्च मतदान
दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान
तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान
पदुच्चेरी विधानसभा निवडणूक
एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान
केरळ विधानसभा निवडणूक
एकाच टप्प्यात निवडणूक- ६ एप्रिल रोजी मतदान
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक
पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान
सहावा टप्पा- 26 एप्रिल मतदान
सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान
आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान