ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का?; 'त्या' मागणीनं अडचणीत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:52 AM2021-08-14T06:52:00+5:302021-08-14T06:55:33+5:30
ट्विटर अत्यंत पक्षपाती; राहुल गांधींचा आरोप
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : ट्विटर ही सोशल नेटवर्किंग साइट पक्षपाती आहे. माझे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करण्यात आले. ट्विटर अशी कृती करून भारताच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आमचे राजकारण कसे असावे हे ट्विटर कंपनी ठरवू पाहात आहे. त्या कंपनीचे हे धोरण एक राजकीय नेता म्हणून मला मान्य नाही. ट्विटरची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर घाला आहे. राहुल गांधी म्हणाले, मला ट्विटरवर २ कोटी फॉलोअर आहेत. माझे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करून ती कंपनी या कोट्यवधी लोकांचा मतप्रदर्शनाचा हक्क नाकारत आहे. ट्विटर हे एक तटस्थ व्यासपीठ आहे, असे सांगितले जाते. त्याला या गोष्टींनी तडा गेला आहे.
कायद्यांचा भंग केल्याची तक्रार
दिल्लीतील नऊ वर्षे वयाची बलात्कारपीडित बालिका व तिच्या कुटुंबीयांची सहजी ओळख पटू शकेल असे छायाचित्र झळकविल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय बालहक्क रक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) फेसबुककडे केली आहे.