उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 06:53 PM2024-08-07T18:53:46+5:302024-08-07T19:04:27+5:30
उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी संजय राऊतांच्या सरकारी निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचा मुक्काम आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दिल्लीत आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरेंसोबत दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित आहेत. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत गाठीभेटी करत आहेत.
दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट #UddhavThackeray#RahulGandhi#Congresspic.twitter.com/TJm8yw78Ln
— Lokmat (@lokmat) August 7, 2024
लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते. अवघ्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआनं महायुतीला फटका देत चांगले यश मिळवले. ४८ पैकी ३१ जागांवर मविआचे उमेदवार निवडून आलेत. मात्र जागावाटपात काही ठिकाणी मविआत वाद झाल्याचं दिसून आले होते. विधानसभेत असा वाद उद्भवू नये यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#WATCH दिल्ली: महाराष्ट्र के पूर्व सीएम और शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे अपने बेटे आदित्य ठाकरे के साथ कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी और अन्य पार्टी नेताओं से मुलाकात करने के बाद रवाना हुए। pic.twitter.com/llSWeic6jM
— ANI_HindiNews (@AHindinews) August 7, 2024
"‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’, अशी उबाठाची अवस्था"
मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावे लागत आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात, तेव्हा तुम्ही टीका करतात. बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबध नाही, असे सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर केली.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०१९ ला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याआधी राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. काँग्रेसनेही राज्यात २० ऑगस्टपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.