"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 04:43 PM2024-06-20T16:43:36+5:302024-06-20T16:44:40+5:30

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील."

UG NEET Paper Leak : "PM Modi stopped war, but could not stop paper leak", Rahul Gandhi's attack | "PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

UG NEET Paper Leak : NEET UG आणि UGC NET परीक्षांचा मुद्दा देशभर गाजतोय. या परीक्षांचे पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. "सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, NEET परीक्षेनंतर आता UGC NET परीक्षेतही हेराफेरी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळेच परीक्षेच्या एका दिवसानंतर ही परीक्षा रद्द केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवले, पण पेपरफुटी थांबवता आली नाही
राहुल पुढे म्हणतात, "शिक्षण व्यवस्थेची अवस्था नोटाबंदीसारखी झाली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडून गेलीये. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जाते, पण ते भारतात सुरू असलेली पेपर लीक थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत. एका परीक्षेत अनियमितता आढळून आल्यावर ती रद्द केली, आता दुसरी रद्द होईल की नाही माहीत नाही. यासाठी दोषींना पकडलेच पाहिजे," असे राहुल म्हणाले. 

शिक्षण व्यवस्थेवर भाजपचे नियंत्रण
"भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतेय. संपूर्ण शिक्षण व्यवस्था भाजप आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांनी काबीज केल्या आहेत. हे लोक प्रत्येक पदावर आपलेच लोक नियुक्त करतात. आपल्याला ही व्यवस्था बदलून लावायची आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणा नव्याने तयार करावी लागेल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. सरकारवर दबाव आणून या दोन्ही गोष्टी मार्गी लावण्याचा विरोधक प्रयत्न करतील. हे सरकार मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळले जात आहे," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पेपरफुटी ही देशविरोधी कृत्य
पत्रकार परिषदेत राहुल यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "यात्रेदरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता देशात NEET आणि NET चे पेपर लीक झाले आहेत. पेपरफुटी राष्ट्रविरोधी कृती आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना संधी खूप कमी आहेत. तरुणांना पुढे जाण्याचा मार्ग नाही. हे एक गंभीर राष्ट्रीय संकट आहे. त्यामुळे पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यांना पकडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."

Web Title: UG NEET Paper Leak : "PM Modi stopped war, but could not stop paper leak", Rahul Gandhi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.