"मी विशेषत: कॉंग्रेसचे आभार मानते, कारण...", विरोधकांच्या बैठकीवरून स्मृती इराणींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:17 PM2023-06-23T12:17:14+5:302023-06-23T12:17:57+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्ष एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येते बैठक घेत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटी घेतल्या. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे कळते. यावरूनच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा आदी नेते उपस्थित आहेत.
#WATCH | "I especially thank Congress for publicly announcing that they cannot alone defeat PM Modi and that they need the support of others to do so," says Union Minister Smriti Irani on #OppositionMeetingpic.twitter.com/cxkB5mxXK4
— ANI (@ANI) June 23, 2023
विरोधकांच्या बैठकीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडवली. "मी विशेषत: काँग्रेसचे आभार मानते. कारण ते एकटे पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकत नाहीत आणि त्यासाठी त्यांना इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे हे जाहीरपणे दाखवून दिले आहे", अशी टीका इराणींनी केली.
विरोधी पक्षातील दिग्गजांची हजेरी
या बैठकीला काँग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, पीडीपी सुप्रीमो मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. सीताराम येचुरी आणि डी राजा यांसारखे अनेक डावे नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.