'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 01:37 PM2019-10-29T13:37:24+5:302019-10-29T14:15:49+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

‘Unique nationalism’: Priyanka Gandhi joins Opposition chorus on EU MPs’ visit to J&K | 'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजपाचा हा राष्ट्रवाद अजबच आहे' असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. काँग्रेससह विरोधकांनीही युरोपियन युनियनचं शिष्टमंडळाच्या जम्मू- काश्मीर दौऱ्यावरून सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ आज जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ या भागाला भेट देणार आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'हा अजबच राष्ट्रवाद आहे' असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेससह विरोधकांनीही युरोपियन युनियनचं शिष्टमंडळाच्या जम्मू- काश्मीर दौऱ्यावरून सरकारवर टीका केली आहे. 'काश्मीरमध्ये युरोपच्या प्रतिनिधींना फेरफटका मारण्याची आणि हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाते. मात्र, भारतीय खासदार व राजकीय नेत्यांना विमानतळावरूनच परत पाठवलं जात आहे. हा मोठा अजब राष्ट्रवाद आहे' असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. मंगळवारी (29 ऑक्टोबर) प्रियंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून असं ट्वीट केलं आहे. 

युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. राहूल गांधी ट्विट करत म्हणाले की, जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय खासदारांना जाण्यापासून रोखण्यात येतं. मात्र परदेशी नेत्यांना काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने यामध्ये काही तरी चुकीचं असल्याचं सांगत राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला परवानगी देण्यात आली. मात्र, विरोधकांना त्याठिकाणी जाण्याची परवानगी का देण्यात येत नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे, भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्र सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढल्यानंतर जगभरात हा विषय चर्चेत आला. पाकिस्ताननं अनेकदा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या परिषदांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सगळ्याच व्यासपीठांवर पाकिस्तानला अपयश आलं. यानंतर आता युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ जम्मू काश्मीरला भेट देणार आहे. या शिष्टमंडळात 28 सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत भारतानं कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाचा जम्मू काश्मीर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं मोदींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. जम्मू-काश्मीरसह देशाच्या अनेक भागांचा शिष्टमंडळाकडून केला जाणारा दौरा यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केला आहे. भारताच्या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाला सांस्कृतिक विविधता आणि विकास कामंदेखील पाहता येतील, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. एका सामाजिक संस्थेनं युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाची जम्मू काश्मीरचा दौरा आयोजित केला आहे. शिष्टमंडळातले बहुतांश सदस्य इटालियन आहेत. 
 

Web Title: ‘Unique nationalism’: Priyanka Gandhi joins Opposition chorus on EU MPs’ visit to J&K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.