अखेर राहुल-अखिलेश एकत्र येणार; युपीत काँग्रेसला 17 जागा देण्यास समाजवादी पार्टीचा होकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 04:10 PM2024-02-21T16:10:54+5:302024-02-21T16:11:37+5:30
अनेक चढ-उतारानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Loksabha Election 2024: अनेक चढ-उतारानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपा आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाली असून, आघाडीच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे जवळपास एकमत झाले आहे. रिपोर्टनुसार, काँग्रेस युपीत 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज संध्याकाळपर्यंत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल.
मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे की, या 17 जागांपैकी काँग्रेसने दोन जागांवर बदल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने बुलंदशहर आणि हाथरसऐवजी सीतापूर आणि श्रावस्तीच्या जागा मागितल्या आहेत. अखिलेश यादव यांनीही हा प्रस्ताव मान्य केल्याचे बोलले जात असून आज सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते.
After seat-sharing between Samajwadi Party and Congress in Uttar Pradesh is finalised, Congress UP in-charge Avinash Pande and party's state unit president Ajay Rai to hold a joint press conference in Lucknow today evening. https://t.co/kI8RBTn5pn
— ANI (@ANI) February 21, 2024
काँग्रेस या 17 जागांवर निवडणूक लढवणार
उत्तर प्रदेशमध्ये INDIA आघाडीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. यात एक किंवा दोन जागांवर बदल होऊ शकतो.
सर्व काही ठीक आहे-अखिलेश यादव
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि सपामध्ये जागावाटपावरुन वाद सुरू होता. आता अखेर आघाडी होणे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत मीडियाशी बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “शेवट चांगला तर सगळंच चांगल. होय, आघाडी होणारच, यात काहीच वाद नाही. काही तासांत सर्व काही स्पष्ट होईल.” यासंदर्भात दोन्ही पक्षांकडून संयुक्त पत्रकार परिषदही घेतली जाऊ शकते.
सपाने 31 उमेदवारांची घोषणा केली
विशेष म्हणजे, आघाडी होण्यापूर्वीच समाजवादी पार्टीने आतापर्यंत 31 उमेदवारांची घोषणा केली आहे. सपाने संभल, बदाऊन, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, खेरी, धौराहारा, उन्नाव, लखनौ, फारुखाबाद, अकबरपूर, बांदा, फैजाबाद, आंबेडकरनगर, बस्ती, गोरखपूर, कैराना, बरेली, हमीरपूर, वाराणसी, मुजफ्फरनगर, शहापूर, हरदो, अमला, बरैली, मिसरिख, मोहनलालगंज, प्रतापगड, बहराइच, गोंडा, गाझीपूर आणि चंदौली जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.