अमेठी, रायबरेलीमधून काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार? ज्येष्ठ नेत्याने दिले सूचक संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:00 AM2024-04-11T10:00:44+5:302024-04-11T10:01:44+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीमधील आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटोनी यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत दिले आहेत.
कोणे एकेकाळी काँग्रेसचा प्रभाव राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची अवस्था सध्या बिकट झालेली आहे. येथील अमेठी आणि रायबरेली या बालेकिल्ल्यांमध्येही काँग्रेसचं पूर्वीसारखं वर्चस्व राहिलेलं नाही. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीमधील आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटोनी यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे सूचक संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशातून राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात. यावेळी अँटोनी यांनी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या निवडणूक लढवण्याबाबत केलेल्या दाव्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.
अमेठी आणि रायबरेली हे गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ राहिले आहेत. तसेच अपवाद वगळता गांधी कुटुंबीय येथून सातत्याने विजयी होत आले आहेत. मात्र २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये राहुल गांधी यांना पराभवाचा धक्का दिला होता. आता स्मृती इराणी ह्या अमेठीमधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र काँग्रेसने येथील उमेदवारीबाबत गोपनियता बाळगली आहे. तर रायबरेलीमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे. येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २६ एप्रिल ते ३ मे ही असेल.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ए.के. अँटोनी यांनी काल सांगितले की, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीतरी एकजण उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तुम्ही अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारांची नावं जाहीर होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहा. तर्कवितर्क लढवण्यात काही अर्थ नाही. नेहरू-गांधी कुटुंबातील एक सदस्यच उत्तर प्रदेशातून लोकसभेची निवडणूक लढेल.
दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता अँटोनी यांनी असं होणार नाही असे सांगितले. तसेच देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांचा गांधी कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे, असा दावाही अँटोनी यांनी केला.