काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने बागेश्वर धाममध्ये जाऊन घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट, हिंदुराष्ट्राबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:35 PM2023-02-13T14:35:18+5:302023-02-13T14:35:29+5:30
Congress: मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धाममध्ये आजपासून सुरू झालेल्या धर्म रक्षार्थ यज्ञ आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आयोजित यज्ञाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उपस्थिती लावली
मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धाममध्ये आजपासून सुरू झालेल्या धर्म रक्षार्थ यज्ञ आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आयोजित यज्ञाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उपस्थिती लावली. पन्ना जिल्ह्यातील अजयगड येथे जाण्याआधी बागेश्वर धाममध्ये असलेल्या हेलिपॅडवर उतरले. तिथे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर बालाजी हनुमानांचे दर्शन घेतले. तसेच यादरम्यान त्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर कमलनाथ यांना धीरेंद्र शास्त्री येथे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी यज्ञ करत आहेत, असा प्रश्न विचारला असता कमलनाथ यांनी भारत हा राज्यघटनेनुसार चालतो, असे स्पष्टपणे सांगितले.
मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे सातत्याने मंदिरांचा दौरा करत आहेत. हल्लीच त्यांनी राज्यातील पुजाऱ्यांच्या वेतनावरून राज्य सरकारवर हल्ला केला होता. तसेच जबलपूर येथील ग्वारीघाट येथे माता नर्मदेची पूजा केली होती. राजकीय दृष्ट्या हा दौरा खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी भाजपाच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्याचा कमलनाथ यांचा प्रयत्न आहे.
सध्या बागेश्वर धाममध्ये सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. येथील धार्मिक कार्यक्रम हे १९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये २१ कथावाचक आणि भजनगायक भाग घेणार आहेत. तसेच येथे दर्शनासाठी नेतेमंडळीही येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज बागेश्वर धाम येथे आलेल्या कमलनाथ यांनी बागेश्वर बालाजी मंदिरात पूजा केली. धीरेंद्र शास्त्री यांनी कमलनाथ यांना कन्या विवाहाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.