Video: 'मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा', मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:07 PM2022-11-14T21:07:46+5:302022-11-14T21:08:14+5:30
नेहमीच चर्चेत राहणारे मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्वाल्हेर: नेहमीच चर्चेत राहणारे मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी घर पाडल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणतात की, 'तुम्हाला हवे असेल तर मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा, माझ्यावर दगड फेका. काँग्रेस नेते शैलेंद्र चौधरी यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.
नेमकं काय झालं?
ग्वाल्हेर विधानसभेच्या किला गेट चौक ते फूलबाग सेवानगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रलंबित आहे. याचे रुंदीकरण करण्यासाठी सातत्याने अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे घरे व दुकानांच्या तोडफोडीला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. रविवारी जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई केली.
"मुझे जूते मारो मुझे लाठी मारो..... अगर आप मुझसे संतुष्ट नहीं हो तो"
— Shailendra Choudhary (@shailendra489) November 14, 2022
बीजेपी के इन मंत्री जी को बीजेपी के किस शीर्ष नेता से प्रेरणा या ट्रेनिंग मिली है? https://t.co/rNXvHQo4pY
यादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर स्थानिक लोकांनी ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. याची माहिती ऊर्जामंत्री प्रद्युमन सिंह तोमर यांना समजताच ते संतप्त लोकांमध्ये पोहोचले. ते रस्त्याच्या मधोमध उभे राहून त्यांच्या शैलीत बोलले. 'तुम्हाला हवे असेल तर मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा, माझ्यावर दगड फेका. पण, तेच करेन, जे भावी पिढ्यांच्या हिताचे असेल. तुम्ही मला निरुपयोगी समजत असाल आणि मी तुमच्या कामाचा नाही असे मानत असाल, तर मी आजच राजीनामा द्यायला तयार आहे.' तोमर हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मानले जातात.