Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 10:14 PM2019-05-08T22:14:42+5:302019-05-08T22:15:41+5:30
मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.
भोपाळ - मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीवरुन भाजपाने काँग्रेसवर टीका केली होती. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यानंतर, आता भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणींनीही कर्जमाफीवरुन मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित नागरिकांनी उलट उत्तर देत स्मृती इराणींनाच गोंधळात टाकलं.
मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे. तर, काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपाला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. येथील काँग्रेस नेत्यांनी अनोखी शक्कल लढवत थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे घर गाठले होते. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये शिष्टमंडळाने कर्जमाफी केल्याचे पुरावे म्हणून दस्तावेज दिले. तब्बल एक गाडी भरुन हे दस्तावेज शिवराज चौहान यांच्या घरी आणून त्यांच्यासमोर ही सगळी कागदपत्रे ठेवली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क आयड्रॉप्स, बदाम आणि चव्यनप्राश पाठवून शिवराज सिंह चौहान यांनी खिल्ली उडवली. तर, आता स्मृती इराणींच्या सभेत काही कार्यकर्त्यांनी गोंधळा घातला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचे शेवटचे दोन टप्पे बाकी असून प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मध्य प्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी अशोक नगर येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी, एका सभेला संबोधित करताना काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचं त्यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकांवेळी काँग्रेसने 10 दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. मला सांगा, कर्ज माफ झालंय? असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला. त्यावेळी, या सभेला ऐकणाऱ्या काही नागरिकांनी हो झाली.. हो झाली... म्हणत स्मृती इराणींची गोची करुन ठेवली. तर, त्यावेळी तिथे उपस्थितांपैकी काहींनी यास प्रतिउत्तर देण्यासाठी मोदी मोदीच्या घोषणाही दिल्या. मात्र, कर्जमाफी झाली का, या प्रश्नावर होय.. होय.. झाली असे उत्तर मिळाल्याने काही वेळी स्मृती इराणीही गोंधळात पडल्याचे दिसून आले.
स्मृति ईरानी की हुई किरकिरी :
— MP Congress (@INCMP) May 8, 2019
स्मृति ईरानी ने मप्र के अशोकनगर में मंच से पूछा क्या किसानों का कर्जा माफ हुआ है ? तो सभा के बीच में किसानों ने चिल्ला कर बताया “हां हुआ है, हां हुआ है, हाँ हो गया है”।
—अब जनता भी इन झूठों को सीधे जवाब देने लगी है।
“अब तो झूठ फैलाने से बाज़ आओ” pic.twitter.com/N9g64K7xAC
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, आता जनताच यांच्या खोटारडेपणाला उत्तर देईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.