Video: पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला ओपन चॅंलेज, हिंमत असेल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:05 AM2019-05-07T11:05:11+5:302019-05-07T11:06:27+5:30
राजीव गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसला नरेंद्र मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे.
चाईबासा - राजीव गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसलानरेंद्र मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे. जर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधींच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. झारखंड येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी हे आव्हान दिलं आहे.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, बोफोर्स भ्रष्टाचाराचं नाव घेतलं तर काँग्रेसमध्ये वादळ आलं. राजीव गांधींचे नाव घेतलं तर त्यांच्यात पोटात इतकं दुखू लागलं की जोरजोरात रडू लागलेत. मात्र ते जेवढं रडतील तेवढे सत्यही लोकांसमोर येईल. हीच माणसं मर्यादेच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानांना शिव्या देत होते असा टोला मोदींनी लगावला.
अद्याप दिल्ली, भोपाळ आणि पंजाब येथील निवडणुकीतलं मतदान बाकी आहे. मी संपूर्ण काँग्रेस पक्षाला, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जाहीर आव्हान देतो की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर येणाऱ्या दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवावी. जर त्यांच्यात दम असेल तर निवडणुकीच्या मैदानात त्यांनी उतरावं मग कोणामध्ये किती ताकद आहे ते कळेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
My open challenge to Congress.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) May 6, 2019
Fight elections in the name of the former PM associated with Bofors in:
Delhi and Punjab, where innocent Sikhs were butchered in his reign.
Bhopal, where he helped Warren Anderson flee after the infamous Gas Tragedy.
Challenge accepted? pic.twitter.com/CstT0VyITd
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही वाचू शकणार नाहीत असं राहुल यांनी सांगितलं होतं. तर अनेक जणांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानांवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?
प्रचारसभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्यावरुन राजीव गांधींवर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती.